मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर शिंदे आंबेरी येथे ट्रकने घेतला पेट
संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील शिंदे आंबेरी येथे शुक्रवारी दुपारी 2 वाजता सिमेंट भरलेल्या टँकरने अचानक पेट घेतला. टँकरने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत उडी मारल्याने अनर्थ टळला. या घटनेने महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी समयसूचकता दाखवल्याने पुढील हानी टळली. मुंबईहून गोव्याच्या दिशेने सिमेंट घेऊन जाणारा टँकर संगमेश्वर आरवली दरम्यान शिंदे आंबेरी येथे येताच या टँकरने अचानक पेट घेतला. टँकरला आग लागल्याचे लक्षात येताच चालक अशोक चव्हाण (रा. परभणी) याने गाडीतून उडी मारली. तर टँकरला आग लागल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, ही बाब तेथे माजी सभापती मनीषा गुरव यांचे पती मुकुंद गुरव यांच्या लक्षात येताच त्यांनी रिक्षा संघटना अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांना याबाबतची माहिती दिली. मिलिंद चव्हाण यांनी तत्काळ याबाबत पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे यांना दूरध्वनीवरून कल्पना दिली व तत्काळ हायवेचे काम करणार्या जे एम म्हात्रे कंपनीशी संपर्क साधत पाणी टँकर घटनास्थळी पाठवण्याची विनंती केली. या नंतर तत्काळ घटनास्थळी पाण्याचा टँकर उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यास मदत झाली. सहाय्यक पोलिस कॉन्स्टेबल सी. टी. कांबळे, हेड कॉन्स्टेबल एस. एस. शिंदे, पोलीस नाईक विश्वास बरगले, बी. डी. खोंदल, अजय मोहिते, किशोर जोयशी आदींनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक व्यवस्था व आग आटोक्यात आणण्यास मदत केली. या घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.