मुख्यमंत्र्यांच्या आगमनासाठी रत्नागिरी जिल्हा सज्ज; आठशे कोटींच्या विकासकामांचा करणार शुभारंभ
रत्नागिरी : मुख्यमंत्र्यांच्या आगमनासाठी रत्नागिरी जिल्हा सज्ज झाला आहे. पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नियोजनातून तब्बल आठशे कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ होणार आहे. यावेळी ना. उदय सामंत व अन्य तीन खात्यांचे मंत्री शुक्रवारी 16 रोजी रत्नागिरीत येणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी दौर्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह व पोलीस अधीक्षक धनंजय कुळकर्णी यांनी सुरक्षेचा आढावा घेतला. मुख्यमंत्री ज्या मार्गावरून जाणार असणार्या मार्गावर प्रात्यक्षिकही घेण्यात आले. गुरुवारी सायंकाळपासूनच शासकीय विश्रामगृहासह मार्गावर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
मुख्यमंत्री शिंदे रत्नागिरीत आल्यानंतर मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार असून नव्याने उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीसह बाळासाहेबांचा हात या प्रतिकृतीची पाहणी करणार आहेत. यानंतर ते श्रीदेव भैरी मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. यानंतर ते रत्नागिरी जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री उदय सामंत, बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.
जिल्हा बार असोसिएशनच्या समस्या, एसटीच्या संपानंतर नव्याने स्थापन झालेल्या कर्मचारी संघटनेसोबतही मुख्यमंत्री चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. आंबा बागायतदार व मच्छीमार संघटनांचे प्रतिनिधी भेट घेणार आहेत. शिक्षक, जिल्हा परिषद व महसूल संघटनांचे पदाधिकारीही मुख्यमंत्र्यांना भेटणार असून त्यांच्या प्रश्नावर चर्चा करणार आहेत.
दुपारी 3.45 वा. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5.45 वा. स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात आयोजित 800 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे करणार असून यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
यानिमित्ताने शहरातील मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण, मिर्या-हातखंबा नळपाणी योजना, नाणिज येथील धरण, जयगड नळपाणी योजनेसाठीचे धरण या प्रमुख कामांसह अनेक विकासकामांचा शुभारंभ करणार आहेत.
असा असेल दौरा कार्यक्रम
-हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणाचे लोकार्पण.
-शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे भूमिपूजन.
-जिल्ह्याच्या विकासाबाबत आढावा बैठक.
-आंबा बागायतदार, मच्छीमार संघटना पदाधिकार्यांशी चर्चा.
-शिक्षक, वकील, शासकीय कर्मचारी संघटनांच्या पदाधिकार्यांशी चर्चा.
-स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे जाहीर मेळावा