गावठी व गोवा बनावटीच्या दारूवर राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करण्याची मागणी
रत्नागिरी : गावठी दारू निर्मिती केंद्र, गावठी दारू धंदे आणि गोवा बनावटीच्या विदेशी मद्य वाहतुकीवर जिल्हा पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईनंतर पोलिस अधीक्षक धनंजय कुळकर्णी यांचे रत्नागिरी जिल्हा देशी मद्य विक्रेता संघाने प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले. अशीच कारवाई राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने करावी, यासाठी अधीक्षकांना निवेदन दिले आहे. याबाबतची माहिती मद्यविक्रेता संघाचे कार्याध्यक्ष रोहन देवकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोव्हीड निर्बंध पूर्णपणे उठल्यानंतर देशी दारुचा ग्राहक परवानाधारक दुकानांमध्ये येणे बंद झाल्याने विक्री कमी झाली. पर्यायाने लाखो रुपये नूतनीकरण फी देऊनही ग्राहक तुटल्याने शासनाचा महसूल कमी होऊ लागला. ग्राहक तुटल्याने आता आम्ही परवाने रद्द करावे का? असा विचार करू लागलो आहोत. अशावेळी राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) आणि पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित होते. जिल्हा पोलिसांनी गावठी दारु आणि गोवा बनावटीच्या मद्य वाहतुकीवर कारवाई केली तशी कारवाई राज्य उत्पादन शुल्कने करावी, यासाठी अधीक्षक सागर धोमकर यांना निवेदन दिले असल्याचे देशी मद्य विक्रेता संघाचे अध्यक्ष राजीव कीर यांनी सांगितले. राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.