संगमेश्वर तालुक्यातील सायले पंचक्रोशीत लम्पीचा प्रादुर्भाव
संगमेश्वर : तालुक्यातील सायले पंचक्रोशीतील सायलेसह अन्य गावांमध्ये लम्पी आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून जनावरांना लम्पीची लागण होत आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लम्पी आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी तालुका पशु विभागाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी सायले गावचे उपसरपंच शेखर पांचाळ यांनी केली आहे.
तालुक्यातील सायले गावासह काटवली, विघ्रवली, कोंडओझरे, सोनवडे आदी गावांमध्ये लम्पी आजाराने थैमान घातले असून, आतापर्यंत सहा जनावरे लम्पी आजाराने दगावली आहेत. अनेक जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. त्यामुळे तालुका पशु विभागाने लम्पी आजाराचा फैलाव रोखण्यासाठी काय उपाययोजना केली? असा संतप्त सवाल सायले गावचे उपसरपंच शेखर पांचाळ यांनी केला आहे.
सायले पंचक्रोशीतील सायले गावासह काटवली, विघ्रवली, कोंडओझरे, सोनवडे आदि गावांमध्ये लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून या गावांमधील काही जनावरांना लम्पी आजाराची लागण झाली आहे. हा आजार रोखण्यासाठी पशु विभागाने तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे. तसेच ग्रामस्थांमध्येही या आजारासंदर्भात जनजागृती करणे अतिशय गरजेचे बनले आहे. या आजाराची लागण इतर जनावरांना होऊ नये, यासाठी तालुका पशू विभागाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी उपसरपंच शेखर पांचाळ यांनी केली आहे.