
भारतातील पाच लखपतींपैकी चिपळूणच्या संयुक्ता गुजर यांना लखपती दिदी होण्याचा मान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच भारतातील ५ लखपती दिदींशी संवाद साधला. चिपळूणच्या संयुक्ता गुजर यांना या भारतातील पाच महिलांपैकी एक महिला होण्याचा मान मिळाला. एकापेक्षा जास्त व्यवसाय करून लाखात उत्पन्न असलेल्या महिलांना लखपती दिदी होण्याचा मान देण्यात येतो. अशाच वेगवेगळे व्यवसाय करून आपले उत्पन्न लाखात घेवून जाणार्या महिलांमध्ये चिपळूणच्या संयुक्ता गुजर यांचा समावेश आहे. गुरूवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.देशातील स्वयंसहाय्यता समुहातील महिलांसाठी राबवण्यात येणारी लखपती दिदी योजना आता देशात तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचत आहे. स्वयंसहाय्यता समुहातील ज्या महिलांची आर्थिक उलाढाल लाखांच्या घरात आहे, तसेच ज्या महिला आपल्यासोबतच इतर महिलांनाही उत्पादनाचे साधन उपलब्ध करून देत आहेत आणि शासकीय योजनांचा लाभ घेवून आपल्या व्यवसायात प्रगती करत आहेत, अशा महिलांचा समावेश प्रामुख्याने या योजनेसाठी केला जात आहे. भारतातील अशाच ५ महिलांना ११ मार्च २०२४ रोजी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. या ५ महिलांमध्ये चिपळूण तालुक्यातील सखी समूहातील संयुक्ता गुजर यांचा समावेश होता.www.konkantoday.com