शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता चाचणी फेब्रुवारीत
रत्नागिरी : शिक्षक भरतीसाठी आवश्यक अभियोग्यता आणि बुध्दीमापन चाचणी फेब्रुवारी महिन्यातच घेण्यात येणार आहे. संबंधित परीक्षेसाठी टिसीएस, आयबीपीएस आणि एमकेसीएल संस्थांमधून एका संस्थेची निवड करण्यात आली आहे. परीक्षेसाठी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेण्यासाठी तयारी करण्यात येत आहे, अशी माहिती राज्य परीक्षा परीषदेतील अधिकार्यांनी दिली.
ऑनलाईन पध्दतीनेच परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेची आढावा बैठक मंगळवारी घेण्यात येणार आहे. सध्यातरी न्यायालयात सादर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेण्याची तयारी राज्य परीक्षा परिषदेमार्फत करण्यात येत आहे. परीक्षेच्या संभाव्य वेळापत्रकानुसार, 16 डिसेंबरला परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. तर प्रत्यक्ष परीक्षा 17 ते 28 फेब्रुवारीदरम्यान घेण्यात येणार आहे. परीक्षेचा निकाल 5 मार्च 2023 ला जाहीर करण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या खासगी, अनुदानित, विनाअनुदानित, अनुदानास पात्र ठरलेल्या आणि पात्र घोषित झालेल्या शाळांमधील शिक्षण सेवकांची भरती अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारे करण्याचा निर्णय 2017 साली घेण्यात आला आहे. त्यासाठी पवित्र पोर्टल तयार करण्यात आले आहे.
सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा अभियोग्यता आणि बुध्दिमापन चाचणी घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु डिसेंबर 2017 नंतर राज्यात पुन्हा कधीही ही परीक्षा घेण्यात आली नाही.