
राज्यासह मुंबईतील व्यायामशाळांमध्ये वापरण्यात येणाऱ्या औषधांवर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर
राज्यासह मुंबईतील व्यायामशाळांमध्ये वापरण्यात येणाऱ्या औषधांवर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर असणार आहे. व्यायामशाळेत प्रशिक्षकाचा सल्ला न घेता उत्तेजनात्मक औषधे घेऊन मृत्यू झाल्याच्या घटना ताज्या असताना नुकतेच एफडीएने मीरारोड येथील विनापरवाना औषधांचा वापर करणाऱ्या व्यायामशाळेतून तब्बल ५ लाख ३१ हजार रुपयांचा साठा जप्त केला आहे.मुंबईतील अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांना १० नोव्हेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, क्षेत्रीय औषध निरीक्षक यांच्या पथकाने कन्हैया कनोजिया यांच्या मालकीच्या मे. के-५ फिटनेस ॲण्ड वेलनेस स्टोर, शॉप नं. २, सरोगे एवेन्यू, बेवेर्ली पार्क, कनाकिया रोड, मीरा रोड (पु.), जि. ठाणे या दुकानात पंचासह तपास आणि चौकशीसाठी धाड टाकली. या जागेत व्यायामशाळेत बॉडी बिल्डर्सद्वारे गैरवापर करीत असलेल्या मेफेनटरमीन इंजेक्शन, टेस्टोसटेरोण इंजेक्शन, ग्रोथ होर्मोन इंजेक्शन आणि विविध प्रकारच्या औषधांचा मोठ्या प्रमाणावर साठा विनापरवाना विक्रीसाठी ठेवला होता.
www.konkantoday.com