नेताजी सुभाषचंद्र रंभाजी डांगे……बस नामही काफी है…और रहेगा भी….
डांगेसाहेब यांच्या आकस्मिक निधनाची बातमी वाचून मला अतिशय दु:ख झाले आणि माझ्यासारख्या आणखी कितीतरी रत्नागिरीकरांनाही ते झाले असेल यात शंकाच नाही. आज बघता बघता या घटनेला दहा दिवस झाले पण अजून आठवण जात नाही.
आमचे मित्र कै. बाळासाहेब तथा बाळ भिसे यांच्या टिळक आळीतील नवकोकण निवासस्थानी त्यांच्या आरसा साठी काहीतरी लिखाण द्यायला गेलो होतो. एक भारदस्त पोलिस अधिकारी त्यांचेशी गप्पा मारताना दिसला. बाळासाहेबांनी माझी ओळख करून द्यायच्या आतच एका दमदार म्हणजे स्टीरिओफोनिक साऊंडमध्ये मी पी. आय. नेताजी सुभाषचंद्र रंभाजी डांगे, रत्नागिरी पोलिस स्टेशन असे म्हणून त्या अधिका-यानी माझा हात हातात घेऊन हस्तांदोलन केले..हात कसला तो हातोडाच ! मी पण हात सांभाळत मी धनंजय भावे एवढीच ओळख करून दिली आणि थांबलो. सिटीला नवीन कोणीतरी कडक इंन्स्पेक्टर आलेत असे ऐकून होतो पण तीच व्यक्ति पुढ्यात भेटल्यावर मी दचकलोच. तसा माझा आणि पोलिस स्टेशनचा फारसा संबंध नव्हता कधी काळी गणेशोत्सव मिरवणूक तर कधी पक्षाची प्रचार फेरी यांच्या परवानग्या काढण्यासाठी गेलो असेल तेव्हढाच. सामान्य माणसाजवळ स्वत:हून ओळख करून देणारे डांगेसाहेब काहीतरी वेगळेच होते हे मला त्याचवेळी जाणवले. त्या परिचयातून वृत्तपत्रामध्ये काही मुक्त लिखाण करण्याच्या निमित्ताने मग बाळ भिसे, सुदेश शेट्ये, अनिल श्रीखंडे यांच्यासारख्या अनुभवी पत्रकारांबरोबर डांगेसाहेबांच्या भेटीगाठी वाढत गेल्या आणि एक वेगळाच मैत्रीचा ऋणानुबंध कधी निर्माण झाला ते कळलच नाही.
खरोखरच सामान्य नागरिकांना जवळचा वाटणारा पोलिसवाला रत्नागिरीच्या जनतेने पहिल्यांदाच पाहिला असावा निदान मी तरी नक्कीच. पोलिसांपासून दोन हात दूरच राहिलेले बरे अशी सर्वसामान्यांची पहिली प्रतिक्रिया. डांगेसाहेब त्याला अपवाद ठरले. खरे तर पोलिस स्टेशनचा चेहरा-मोहरा त्यांच्या अस्तित्वाने पालटून गेल्याचे जाणवत होते. आम्ही कधी गेलो की कासेऽऽकर अशी प्रदीर्घ हाक ऐकू यायची एक किरकोळ शरीरयष्टीचा पण नुकतेच मिसरूड फुटलेला पोलिस धावत यायचा आणि आमच्याकडे एक हास्याचा कटाक्ष टाकून आत्ताच चहा आणतो असे सांगून नाहीसा व्हायचा. तो ज्या प्रकारे त्या हाकेला धाऊन यायचा त्यावरून डांगेसाहेब आणि त्याच्यासारखा कनिष्ठ कर्मचारी यांच्यातील एक वेगळेच बाँडिंग स्पष्टपणे दिसून येत असे आणि स्टेशन सांभाळत असतांना डांगेसाहेब यांची हीच खासियत होती. उगीच आरडाओरड नाही. समोरचा आरोपी कितीही मुरब्बी असला तरी आवाजातील जरबेवरच तो शांत असायचा, त्यालाही त्याच्या भूमिकेतून समजून घ्यायचे ही डांगेसाहेब यांची आणखीन एक खासियत. पोलिस स्टेशनला काय काय घडामोडी होत असतात हे तेव्हा मला कळले.
मला एक गंमतीशीर प्रसंग आठवतो. कै. अरूअप्पा श्री देव भैरी देवस्थानचे अध्यक्ष आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचेही सर्वेसर्वा असल्याने डांगेसाहेब आणि त्यांचा परिचय होताच. आम्ही पोलिस स्टेशनला असताना अप्पांची गाडी घेऊन एक व्यक्ति तेथे आली पोटात तीर्थ टाकलेले होतेच आणि त्याला डांगेसाहेबाना अर्जंट भेटायचे होते. बाहेरील पोलिस कर्मचारी यांना त्याला अडविले आणि समजावून सांगितले की आत्ता तुझी परिस्थिती ठीक नाही…झाले त्याचा पारा चढला डांगेसाहेब माझ्या खिशात असतात असे म्हणत तो थेट साहेबांच्या रुममध्ये घुसला. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे त्याला डांगेसाहेबांची पडी होतीच. पण यातल काहीच घडले नाही तर पुन्हा एकदा कासेऽऽकर अशी दीर्घ हाक…याला आत घे रे…लगेच फोन फिरला.. अप्पा, पक्याला आत टाकलाय…सकाळी तुम्हाला चिपळूणला जायच असेल…सकाळी त्याला सोडतो…तिकडून अरूअप्पा- राहू देत रात्री त्याला तिकडेच… अप्पा मी गाडी आणून सोडतोय..दुसरा ड्रायव्हर बघून ठेवा कोणी नाही भेटला तर मी स्वत:च येतो.. धाड धाड प्रश्न सोडवून विषय समाप्त..काही आरडओरड नाही…तापातापी नाही. आणि नंतर आमची हसून हसून पुरेवाट. असे कधी कधी वागावे लागते इति डांगेसाहेब. कधी कधीतर डांगेसाहेब किरकोळ गुन्हेगारांना नुसतेच त्याला पूर्ण कंटाळा येऊन जाणीव होईपर्यंत स्टेशनला बराच बसवून ठेऊन सोडूनही देत असत. म्हणजे त्यानंतर बहुधा पुन्हा तो असली फालतु कृत्ये करण्याच्या फंदात पडत नसावा अशी त्यांची भावना असावी.
रत्नागिरीमध्ये डांगेसाहेब यांची कारकिर्द लक्षात राहीली ती त्यांच्या गुन्हेगारांच्या मिरवणूकीमुळे. टीकाकार त्याला धिंड म्हणोत पण मला तसे वाटले नाही. दारुचे कॅन हातात आणि डोक्यावर देऊन संबंधित आरोपीत यांना गावातून रस्त्यावरून चालत पोलिस स्टेशनला न्यायचे हा त्यांचा प्रयोग भलताच गाजला होता. नाहीतर पोलिस व्हॅनमधून कोणाला नेला तर त्याची मजाच असायची कारण तो कोणालाच दिसत नसे. पण डांगेसाहेबांचा हा प्रयोग काही प्रमाणात यशस्वी झाला यात शंकाच नाही.
डांगेसाहेबांच्या कालावधीमध्ये गुन्हेगारी झालीच नाही असे माझे बिलकूल म्हणणे नाही. पण काही प्रमाणात का होईना स्थानिक पातळीवर गुन्हेगार मंडळी त्यांना वचकून असायची आणि पोलिस ठाण्यावर सर्वसामान्य जनतेचे निदान ऐकून तरी घेतले जाते असा विश्वास त्यांचे कालावधीमध्ये निर्माण झाला होता असे म्हटले तर वावगे होणार नाही.
काही टीकाकारही होते, शत्रूही होते, खात्यामध्येही त्यांची लोकप्रियता सहन न होणारे होते पण स्वत:च्या वैशिष्ट्यपूर्ण वागणुकीने त्यांच्या पुढ्यात येऊन कोणी बोलण्याचे धाडस करूच शकत नव्हते. टीकाकार शत्रूना आपल्या मैत्रीपूर्ण वागणुकीने केव्हा मित्र बनवले हे त्या टीकाकारांनाही कधी कळलेच नाही. तपासकामामध्ये डांगेसाहेब कमी पडतात असे काहींचे मत होते आणि ते त्यानी जनमानसामध्ये नेण्याचा प्रयत्न केलाही. डांगेसाहेब स्वत:च सांगायचे माझ्या केवळ असण्याने गुन्हेगारी कमी करणारा मी एक फिल्डवर्कर आहे. श्री देव भैरी देवस्थानच्या एका वादग्रस्त प्रसंगात डांगेसाहेब यानी त्यांच्या केवळ पालखीच्या मिरवणुकीतील स्वत:च्या अस्तित्वाने समस्त रत्नागिरीकरांना दाखवूनही दिले होते. काही किरकोळ कारणावरून दंगल/तेढ निर्माण होणार की काय अशी शंका येताच डांगेसाहेब जातीनिशी जीवाची पर्वा न करता मोहल्ल्याच्या गर्दीत घुसलेले आणि वेळीच तेथे शांतता प्रस्थापित करून परतलेलेही डांगेसाहेब अनेकांनी पाहिले आहेत. डांगेसाहेब यांच्या कारकिर्दीनंतर शहरातील बहुतांशी संवेदनाशील भाग शांतही झाले.
रत्नागिरीमधील सर्वसामान्य जनता डांगेसाहेब यांची मित्र होती. खूप व्यक्तिंना ते नावानिशी ओळखत असत. खूप जणांजवळ त्यांची वैयक्तिक मैत्रीही होती. त्यांनाही आज डांगेसाहेबांचे स्मरण होत असेल, त्यांच्या रत्नागिरीमधील कार्यकालाचेही स्मरण होत असेल. मी सकाळी लवकर बॅडमिंटनसाठी जात असे त्यामुळे आमच्या घरात पहाटेपासून लाईट असायचा. घरासमोर धडधडणारा मोठा आवाज करणारी गाडी थांबली की ओळखायचे नाईटराऊंड आटपत आलेले डांगेसाहेब बाहेरूनच हाक मारत घरात येणार…मग चहा एकदा-दोनदा किमान तासभर तरी हा कार्यक्रम. मग तेथूनच घरी सौ. वहिनींना फोन (बहुधा सुखरूप असल्याबद्दलचा)..नशीब आमच्या आसपासच्या मंडळीना त्यांचा माझा परिचय आहे हे माहिती होते नाहीतर पहिल्याच भेटीत भावेंकडे पोलिस गाडी उभी आहे म्हणजे आमच्या मधल्या आळीतील पुलंच्या सर्व व्यक्ति आणि वल्लींना मोठा यक्षप्रश्नच पडला असता. असो.
मला अजूनही डांगे साहेबांची लोकप्रियता आठवते..रत्नागिरीच्या स्टेडियमवर खुल्या नाट्यगृहामध्ये कलाकार नावाच्या अतिशय लोकप्रिय ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होता. तुफान तरूण मंडळी जमली होती. मध्यंतरामध्ये प्रमुख महत्वाच्या व्यक्तींची नावे पुकारून त्यांना स्टेजवर निमंत्रित करण्यात आले. निवेदकांच्या विनंतीनुसार टाळ्यांचा गजर होत होता. पण डांगे साहेबांचा नावाची घोषणा होताच जो काही प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला तो त्यावेळी उपस्थित असलेली तरूण मंडळी विसरूच शकत नाहीत. डांगेसाहेबांनी स्टेजवर एकादी कला पेश करावी अशी जोरदार मागणी होत होती. निवेदकानी एका कोप-यात गदारोळ करीत कार्यक्रमाचा आनंद घेणा-या तरूणाईला नम्रपणे सांगितले की तुम्हीच एकादा कार्यक्रम आहे तेथेच करा डांगेसाहेब लगेचच आपला कार्यक्रम सादर करतील आणि प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला…डांगेसाहेब मात्र खाली उतरल्यावर म्हणाले नशिब सुटलो…
ज्युनिअरशिपच्या काळामध्ये आमच्या वकीलांच्या ग्रुपबरोबर डांगेसाहेबांची अशीच दोस्ती होती. या राकट माणसाजवळ गप्पांची मैफिलही मस्त जमत असे. पोलिस खात्याच्याशिवाय कोणताही विषय घ्या त्याविषयाबाबत बोलण्याची डांगेसाहेबांची तयारी असे. त्यांच्या सहवासातील क्षण विसरणे सर्वथा अशक्य आहे. अलिकडेच त्यांनीच स्वत: मुद्दाम आमचा एक ग्रुप फोटो शेअर केला आणि आता ते सर्व कसे दिसतात ते फोटो पाठवा असेही कळविले होते. तो एक आठवणीचा खजिना म्हणून आज शेअर करतोय.
माझी पत्नी डांगेसाहेबांच्या पत्नी सौ. रोहिणी वहिनी यांचेकडे कला शिकण्यासाठी शिकण्यासाठी क्लासला जात असे. तिला क्लासमध्ये सोडण्यास कधीतरी मी जात असे त्यावेळी त्यांचा आणि आमचा ब-यापैकी कौटुंबिक परिचय झाला होता. वहिनी तर डांगेसाहेब यांच्यापेक्षा कूल. हा माणूस हडेलहप्पी फौजदार तर वहिनी तितक्याच शालिन प्रवृत्तीच्या. काही वेगळेच काँबिनेशन. त्यांच्या घरात गप्पा मारताना डांगेसाहेब यांचा आवाज धारदार असला तरी घरात बोलताना त्यांच्या आवाजात एक वेगळीच मृदुता जाणवायची. आणि तोही डांगेसाहेब यांचा एक वेगळा पैलू असावा असे निदान मला तरी जाणवले. सौ. वहिनींच्या कलेलाही पुढे आणण्यासाठी डांगेसाहेब त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहात असत हेही मी त्यावेळी अनुभवले आणि ते खरेही झाले. डांगेसाहेब बदलून सांगलीला गेले. तेथे त्यांनी सौ. वहिनींना होमिओपॅथिक वैद्यकीय शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आणि त्या तेथेच डॉक्टर झाल्याही. निवृत्तीनंतर डांगेसाहेब वृक्षसंवर्धन जागृतीचे काम करीत होते यातूनच त्यांची मृदुता पुढील आयुष्यातही कायम होती हे दिसून येतेच. मुले संग्राम आणि अभिमन्यू हे रत्नागिरीमध्ये असताना लहान होते. त्यांनी खाकी वर्दी न निवडता त्यांची त्यांची वेगळी क्षेत्रे निवडली होती हे निवृत्तीनंतरच्या रत्नागिरीच्या भेटीमध्ये डांगेसाहेब अभिमानाने सांगत असत. मी वसंतराव चित्रपटासाठी अभिमन्यूने फोटोग्राफी केली आहे हे त्यांनी आम्हाला अगदी अगत्याने कळविले होते.
गेल्याच वर्षी होळी पौर्णिमेला घरी आले होते. नैवेद्याची पुरणपोळी खाण्याचा त्यांचा आमच्या घरातील भेटीचा शेवटचाच योग ठरला. भैरीच्या पालखीचे दर्शन घेऊन जाणार असे ते बोललेही होते. श्री देव भैरी देवस्थानचे विद्यमान अध्यक्ष मुन्नाशेठ यांची त्यांची खूपच जवळची मैत्री होती. रत्नागिरीमध्ये आल्यानंतर काही कुटुंबाना भेट दिल्याशिवाय डांगेसाहेब रत्नागिरी सोडत नसत त्यापैकी मुन्नाशेठचे घर होते. मुन्नाशेठनी डांगेसाहेब यांची एक हृद्य आठवण सांगितली. भैरी देवस्थानला मार्बल बसवायचा ठरल्यानंतर डांगेसाहेबांनी सांगितले होते पहिली मार्बल मी आणून देणार आणि मग तुम्ही देवस्थानने खरेदी करायची. मुन्नाशेठनी माहिती देताच डांगेसाहेब स्वत: त्यांच्या मारुती कारवर टाकून एक मार्बलचा पीस घेऊन आले होते. श्री देव भैरीवर डांगेसाहेब यांची अपरंपार श्रध्दा होती त्याचेच हे द्योतक नव्हे काय.
निवृत्तीनंतर अतिशय छान कौटुंबिक जीवन व्यतीत करणारे डांगेसाहेब यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबियांसह आपणा सर्वांनाच धक्का बसला आहे. डांगेसाहेब यांच्यासारखी व्यक्ति माझ्या जीवनात आली हे मला खूपच आनंददायी होते. प्रत्येकाच्या आयुष्यात अशा व्यक्ति येतच असतात. त्यांच्या त्यांच्या आठवणीत आपण रमतो आणि ती व्यक्ति परलोकी गेल्यावरही आपणही त्यांच्या आठवणीतूनही आनंदच घेत असतो अशी माझी भावना आहे. म्हणूनच ही त्यांना शब्द श्रध्दांजली. डांगेसाहेब यांना सद्गती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख पेलण्यासाठी ताकद मिळो ही परमेश्वरचरणी प्रार्थना.
ॲड. धनंजय जगन्नाथ भावे. 9422052330