
चिपळूण बहाद्दूरशेखनाका उड्डाणपूल दुर्घटनेबाबत ऍड. ओवेस पेचकर यांच्याकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण शहरातील बहाद्दूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर चिपळूणचे सुपुत्र ऍड. ओवेस पेचकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी महामार्गाच्या एकूणच निकृष्ट कामाकडे लक्ष वेधले असून या याचिकेवर २९ नोव्हेंबरला सुनावणी खंडपीठाने निश्चित केली असल्याची माहिती ऍड. पेचकर यांनी दिली.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला होणारा विलंब आणि पडलेल्या मोठ्या प्रमाणातील खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असतानाच आता उड्डाणपूल दुर्घटनेबाबत ऍड. पेचकर यांनी याचिका दाखल केली आहे.
याबाबत बोलताना ते म्हणाले की, गेल्या आठवड्यात चिपळुणात उड्डाणपूल कोसळून दुर्घटना घडली. सोमवारी सकाळी पुलाला गेलेल्या तडा याची पाहणी करण्यासाठी गेलेले काही नागरिक पूल कोसळताना झालेल्या दुर्घटनेत जखमी झाले होते. यामुळे महामार्गावरील बांधकामाच्या निकृष्ट कामाचा पंचनामा झाला आहे. परिणामी केंद्र सरकारच्या विरोधात नव्याने दाखल केलेल्या याचिकेची उच्च न्यायालयानेही दखल घेतली असून न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने याचिकेची सुनावणी २९ नोव्हेंबरला निश्चित केली असल्याचे ऍड. पेचकर यांनी सांगितले.