
कशेडी घाटात दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक
खेड : कशेडी घाटात धामणदेवी गावच्या हद्दीत रविवारी दि.13 रोजी पहाटे पावणे पाचच्या सुमारास 2 एसटी बसेसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एक जण जखमी झाला.
मुंबई-गोवा महामार्गावर एसटी चालक समशेर नवाब तडवी हे आपल्या ताब्यातील मुंबई- रत्नागिरी बस (क्रमांक एम एच 20 बी एल 3689) घेऊन रत्नागिरी दिशेने जात होते. ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात विरुद्ध दिशेला जाऊन समोरून येणाऱ्या बसला धडक दिली. एसटी बस (क्रमांक एम एच 14 बी टी 2557) ही चालक प्रतीक पुरुषोत्तम कदम हे घेऊन येत होते. खेड बाजूकडून देवाचे गोठणे ते बोरीवली बस घेऊन जात होते. दोन्ही बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात चालक तडवी हे किरकोळ जखमी झाले. या दोन्ही बसमधून 52 प्रवासी प्रवास करीत होते.
या अपघाताची माहिती समजतात पोलादपूर पोलीस व कशेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.