
खेडमधील शेलारवाडी-वाकी धरणाला गळती?
चिपळूणमधील तिवरे धरण दुर्घटनेनंतर कोकणातील धरणांच्या सुरक्षततेविषयी चर्चा सुरू झाल्या. जिल्ह्यात पूर्ण असलेल्या धरण प्रकल्पांमधील निम्मी धरणे नादुरूस्त आणि गळकी असून आता यामध्ये आणखी एका धरणाची भर पडली आहे. जिल्ह्यातल्या खेडमधील माणी येथील शेलारवाडी-बाकी प्रकल्पाला गळती लागली आहे. धरणाच्या बंधार्याची मुख्य भिंतीलाही गळती लागली असून पाटबंधारे विभागाने हे धरण फुटू नये म्हणून मर्यादेत पाणी साठा करायला सुरूवात केली आहे. या धरणाची पाणी साठवण उंचीची क्षमता ८४ तालांक असून आता प्रत्यक्षात या धरणात ७० तालांकाच्या वर धरण फुटीच्या भीतीने पाणी साठवले जात नसल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.
दोन वर्षापूर्वी या धरणाच्या मुख्य बंधार्यामधून पाणी झिरपून मोठी गळती सुरू झाली, त्यानंतर धरणासमोर असलेल्या माणी बौद्धवाडीला धोका निर्माण होवू नये, म्हणून धरणाचा पाणीसाठा मर्यादित साठवायला सुरूवात झाली. आता धरणाच्या मुख्य बंधार्याच्या पायथ्याशी पाच ते सहा ठिकाणी पाण्याचे झरे वाहू लागले असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धरणाच्या पायथ्याशी वाहणारे झरे ही धरणाची गळती आहे की ड्रेनेज लाईन याबाबत पाहाणी करून चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. www.konkantoday.com