रत्नागिरी-सिंधुदुर्गचा पुढचा खासदार भाजपाचा : माजी मंत्री बाळासाहेब भेगडे
रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात आगामी लोकसभेच्या निवडणुकीत कमळ फुलेल. पुढचा खासदार भाजपाचा असेल, असे मत भाजपाच्या लोकसभा प्रवास योजनेचे संयोजक व माजी मंत्री बाळासाहेब भेगडे यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, उमेश कुलकर्णी उपस्थित होते. त्यांनी कार्यकर्त्यांशी भाजप कार्यालयात संवाद साधला. यावेळी माजी आ. प्रमोद जठार, शहराध्यक्ष सचिन करमरकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे व पदाधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची जागा बाळासाहेबांची शिवसेना लढवेल, असे वक्तव्य मंत्री दीपक केसरकर यांनी केले होते. यावर बोलताना माजी मंत्री भेगडे म्हणाले की, या मतदार संघावर कमळ चिन्ह असावे अशी कार्यकर्ते व पदाधिकार्यांची मागणी आहे. या मतदार संघाबाबत भाजपाचे राष्ट्रीय नेते निर्णय घेतील. आगामी निवडणूक भाजप व मुख्यमंत्री शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना मिळून एकत्र लढवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निर्णय स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांनी घ्यायचा आहे. त्यांच्या निर्णयाला जिल्ह्यातील पदाधिकारी पाठिंबा देतील.