
कोकण मार्गावर २४ रोजी खेड-पनवेल मेमू स्पेशल धावणार
गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासात रेल्वेगाड्यांना होणारी गर्दीची तीव्रता कमी करण्यासाठी २४ सप्टेंबर रोजी खेड-पनवेल अनारक्षित मेमू स्पेशलसह मडगांव-सीएसएमटी मुंबई एकेरी स्पेशल चालवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने गुरूवारी सायंकाळी जाहीर केले.
२३ सप्टेंबर रोजी गणरायाला निरोप दिल्यानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघणार आहेत. खेडसह दापोली, मंडणगड तालुक्यातील चाकरमान्यांची मुंबईला जाण्यासाठी येथील स्थानकात एकच गर्दी उसळत असते. आरक्षित तिकिटे असून देखील गाड्यांचे दरवाजेच उघडले जात नसल्याने प्रवाशांना माघारी परतावे लागते. प्रसंगी खासगी वाहनांचा आधार घेवूनच मुंबई गाठावी लागते.
या पार्श्वभूमीवर रल्वे प्रशासनाने तीन तालुक्यातील चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी खेड-पनवेल अनारक्षित मेमू स्पेशल जाहीर केली आहे. त्यानुसार ०७१०२ क्रमांकाची खेड-पनवेल मेमू स्पेशल रविवारी धावेल. खेड स्थानकातू दुपारी ३.१५ वाजता सुटून त्याच दिवशी सायंकाळी ७.४५ वाजता पनवेल येथे पोहचेल. ८ डब्यांच्या स्पेशलला कळंबणी बुद्रूक, दिवाणखवटी, विन्हरे, करंजाडी, सापे-वामणे, वीर, गोरेगाव, माणगांव, इंदापूर, कोलाड, रोहा स्थानकात थांबे देण्यात आले आहेत. www.konkantoday.com