शुभमंगल सावधान… कोकणात तुळशी विवाहांना प्रारंभ
सिंधुदुर्ग : ढोलताशांचा गजर, मंगलाष्टकांचा सूर, फटाक्यांच्या आतषबाजीत कोकणात तुळशी विवाह उत्साहात पार पडत आहेत. अजूनही काही दिवस हा सोहळा सुरू राहणार आहे. ग्रामीण भागात घरोघरी जाऊन हा विवाह लावला जातो. काही ठिकाणी भटजींना देखील आमंत्रित केले जाते. कोकणात परिसरातील चालीरीतीनुसार हा विवाह साजरा करण्यात येत आहे.
तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय. या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात. हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे.
तुळशी विवाह म्हणजे तुळशी वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण यांच्याशी विवाह प्रबोधिनी एकादशीपासून करण्याची पूजोत्सव प्रथा आहे. तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते. हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळस ही भारताच्या सर्व प्रांतांत व सर्व भागांत उगवणारी वनस्पती आहे.
हार व फुलांनी सजवलेल्या तुळशी वृंदावनासमोर पाटावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवली जाते. तुळशी आणि पाट यांच्यामध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टकांचा मंगलमय गजर होतो. तुळशी व बाळकृष्णावर अक्षतांचा वर्षाव केला जातो. विवाहानंतर तीर्थ प्रसाद वाटप केला जातो. फटाकेही वाचवले जातात. अशा उत्साहाच्या वातावरणात तुळशी विवाह उत्साहात पार पडत आहेत.