
कशेडी घाट चढणारी बस मागेमागे आली अन् दरीच्या टोकावर येऊन अडकली, दैव बलवत्तर म्हणून…
खेड : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाट चढणार्या खासगी आराम बसमध्ये सोमवारी दि. 14 रोजी मध्यरात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास अचानक बिघाड झाल्याने बस पाठीमागे येऊन घाटातील दरीच्या टोकावर येऊन अडकली. दैव बलवत्तर म्हणून बस दरीत कोसळली नाही, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. यावेळी चालकासह 39 लोक प्रवास करत होते.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार रमेश अदावडे (वय 24, रा. पालपेणे, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील बस (एमएच 09, सिव्ही 7029) घेऊन गुहागर ते विरार जात होता. बसमध्ये 39 जण प्रवास करत होते. सोमवारी दि. 14 रोजी मध्यरात्री 11.30 वाजता कशेडी घाट चढत असताना बसचा मेन लाईनचा बुस्टर पाईप फाटल्याने बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले.
बस नियंत्रणाबाहेर जाऊन वेगाने पाठीमागे येत घाटातील कशेडी आंबा येथील अवघड वळणावर दरीच्या बाजूच्या कठड्याला धडकली. सुदैवाने बस तेथेच थांबल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातामध्ये बसचे किरकोळ नुकसान झाले.
अपघाताची माहिती मिळताच कशेडी घाट पोलिस मदत केंद्रातील पोलिस उपनिरीक्षक अजित चांदणे, सहायक पोलिस फौजदार समेल सुर्वे, श्री. रमागडे, श्री. मोरे, श्री. माजलकर यांनी घटनास्थळी पोहचून अपघातग्रस्त बस चालक व प्रवाशांना मदत केली. महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्याचे काम केले.