`एमपीएससी’द्वारे लिपिक भरतीचा निर्णय लाखो विद्यार्थ्याच्या हिताचा : आ. डावखरे
राज्य शासकीय कार्यालयातील गट-कमधील लिपिक-टंकलेखक संवर्गातील सर्व पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) भरण्याचा निर्णय लाखो विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे, अशी प्रतिक्रिया कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केली आहे. तसेच या मागणीसंदर्भात निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
यापूर्वी राज्यातील सर्व विभागांमध्ये लिपिक-टंकलेखक संवर्गातील पदांसाठी स्वतंत्रपणे परीक्षा घेतली जात होती. प्रत्येक विभागातील लिपिक संवर्गातील परीक्षेसाठी वेगळी जाहिरात, स्वतंत्र परीक्षा आणि निकालांमध्ये बराच अवधी जात होता. त्याचबरोबर या परीक्षांसाठी वेगवेगळे शुल्क विद्यार्थ्यांना भरावे लागत होते. त्यामुळे सर्व विभागांच्या लिपिक-टंकलेखक संवर्गातील परीक्षा `एमपीएससी’मार्फत घ्याव्यात, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांच्याकडून सातत्याने केली जात होती. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्यासह प्रशासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा केला जात होता. त्यानंतर या परीक्षा ‘एमपीएससी’द्वारे घेण्याचा विचार सुरू असल्याचे पत्र राज्याचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी ४ ऑगस्ट रोजी आमदार डावखरे यांना पाठविले होते. त्यात हा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर सरळसेवा पदभरतीच्या प्रचलित कार्यपद्धती ४ मे २०२२ रोजी निश्चित झाली आहे. त्यानुसार आगामी भरती केली जाणार असल्याचे पत्रात स्पष्ट केले होते. अखेर काल राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय काढून लिपिक पदाची भरती राज्य लोकसेवा आयोगामार्फत होणार असल्याचे जाहीर केले.