खेड सन्मित्र नगर येथे महिलेचा मृतदेह आढळला
खेड : शहरातील सन्मित्र नगर येथील मजूर वस्तीत झोपडपट्टीमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना गुरुवारी दि.३ रोजी सकाळी उघड झाली आहे. घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. डाक बंगला परिसरात सन्मित्र नगर येथे मोलमजुरी करणारी काही कुटुंब झोपड्या बांधून वास्तव्य करतात. त्या ठिकाणी महिलेचा मृतदेह असल्याचे मजुरांशी संबंधित मुकादमने पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. बेबी कादरबादशा नदाफ (वय ४५, सन्मित्र नगर खेड) असे मृत महिलेचे नाव आहे.
या घटनेनंतर प्रभारी उपविभागीय अधिकारी सचिन बारी यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पोलिस निरीक्षक निशा जाधव, सहायक पोलिस निरीक्षक सुजित गडदे व कर्मचारी यांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. पोलिसांनी महिलेचा पती कादरबादशा नदाफ (वय ५०) याला मद्यधुंद अवस्थेत ताब्यात घेतले आहे.