नाणीज येथे महिलेच्या डोक्यात सळी मारून साडेबारा तोळ्याचे दागिने लांबवले
नाणीज : नाणीज बस स्टॉप लगतच्या सरोदेवाडी येथे रविवारी रात्री अज्ञात चोरट्याने महिलेच्या डोक्यात लोखंडी सळी मारून गंभीर जखमी करत तिच्या अंगावरील दागिने पळवले. महिला ओरडल्याने व शेजार्याची चाहूल लागल्याने चोरटा अंदाजे साडेबारा तोळे दागिने घेऊन पळून गेला. रविवारी रात्री आठच्या दरम्यान ही घटना घडली. या घरात विजया विलास केतकर (वय 65) एकट्याच राहतात. त्यांच्या पतीचे अपघाती निधन झाले आहे. मुले रत्नागिरीला असतात. त्यामुळे पाळत ठेवून हा प्रकार घडला असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. चोरट्याने मागील दाराने घरात प्रवेश केला. त्यावेळी त्याने स्वयंपाक घरात असलेल्या केतकर यांच्या डोक्यात सळीचे दोन प्रहार केले. त्या रक्तबंबाळ होऊन ओरडत खाली कोसळल्या. चोरट्याने त्यांच्या अंगावरील दागिने ओरबाडून घेतले, तसेच कपाटातील असे मिळून अंदाजे साडेबारा तोळे दागिने घेऊन पोबारा केला. त्या महिलेच्या एका हातातील सोन्याचा बांगड्या त्याला काढता आल्या नाहीत. धांदलीत त्याने रिंगा व किरकोळ दागिने वाटेत टाकले.
महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी धावले. त्यांनी लोकांच्या मदतीने त्यांना पाली ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. महिलेच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूरला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कुटुंबियांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. शेजार्यांचे जबाब घेतले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्त सांडले. रक्ताने माखलेली सळी त्याने तिथेच टाकली आहे. याप्रकरणी पाली पोलिस दूरक्षेत्रात गुन्हा दाखल झाला आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे.