साहील मोरेला आत्महत्येस प्रवृत्त करणार्या संशयित मिताली भाटकरवर गुन्हा
रत्नागिरी : साहील मोरे हा मिताली भाटकरला लग्नाबाबत विचारणा करत होता. परंतु, संशयित मिताली भाटकर ही त्याला लग्नासाठी नकार देत होती. शेवटी आपली आणि आपल्या कुटुंबाची बदनामी होईल, या भीतीने साहील मोरेने फॅनला गळफास घेत आत्महत्या केली. आपल्या भावाला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्यामुळे साहील मोरेच्या बहिणीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित मिताली अरविंद भाटकर (रा. तोणदे, रत्नागिरी) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपूर्वी साईभूमीनगर येथे साहील विनायक मोरे (वय 24, राहणार अलावा, रत्नागिरी) याने गळफास घेत आत्महत्या केली होती. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी साहीलची बहीण ॠतिका विनायक मोरे (वय 28,रा. जाकिमिर्या अलावा, रत्नागिरी) हिने बुधवार 26 ऑक्टोबर रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनुसार, 21 ऑक्टोबर रोजी सकाळी साहील मितालीला भेटण्यासाठी साईभूमीनगर येथील तिच्या मैत्रिणीच्या फ्लॅटवर गेला होता. त्यावेळी मितालीसोबत तिची आरती नावाची मैत्रीणही तिथेच होती. साहील हा मितालीला लग्नाबाबत विचारणा करत होता. परंतु, मिताली त्याला नकारच देत होता. त्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शांताराम महाले करत आहेत.