
वेरळ घाटात कंटेनर उलटून मुंबई-गोवा महामार्ग सहा तास ठप्प
लांजा : मुंबई-गोवा महामार्गावर वेरळ घाटात कंटेनर उलटला. शुक्रवार 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा (एम. एच.- 46 बी. यु. 9326) हा कंटेनर चालकाला अवघड वळणावर अंदाज न आल्याने उलटला. यामुळे वाहतूक सहा तास ठप्प झाली. या अपघातात चालकाने गाडीबाहेर उडी मारल्याने तो बचावला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातानंतर महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी लहान वाहनांना वाट मोकळी करून देत थोड्या प्रमाणात वाहतूक कमी केली. मोठ्या वाहनांना जाण्यासाठी रस्ताच नसल्याने महामार्ग सहा तास ठप्प झाला. या कालावधीत दुचाकी, चारचाकी आदी तत्सम लहान वाहनांना वाहतुकीसाठी जागा करून देण्यात आली. सायंकाळी 4 वाजता तीन क्रेन मशीन घटनास्थळी पोहोचल्या. दोन ते अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर सायंकाळी 6:30 वाजता कंटेनर काढण्यात आला. या अपघातस्थळी महामार्ग पोलिस केंद्र हातखंबा येथील सहायक पोलिस निरीक्षक विक्रमसिंह पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक सचिन सावंत, सहायक पोलिस उपनिरीक्षक घनश्याम जाधव, हेड कॉन्स्टेबल पावसकर तसेच लांजा पोलिस ठाणे येथील पोलिस उपनिरीक्षक प्रशांत जाधव, हेड कॉन्स्टेबल तेजस मोरे, पोलिस कॉन्स्टेबल प्रथमेश वारिक या टीमने मेहनत घेतली. स्थानिक ग्रामस्थांनी देखील याकामी सहकार्य केले.