
पानवल येथे बिबट्याने धावत्या दुचाकीवर घातली झडप
रत्नागिरी: पानवलजवळ एका दुचाकीस्वारावर अचानक बिबट्याने झडप घातली. मात्र सुदैवाने तो दुचाकीस्वार बचावला. ही घटना गुरुवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
अचानक बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे दुचाकी चालक सचिन बेंद्रे यांची भंबेरी उडाली. बेंद्रे हे सकाळी रत्नागिरीत कामानिमित्ताने आले होते. त्यांना काम आटपून घरी जाण्यास सायंकाळी उशीर झाला होता. त्यांची दुचाकी पानवल येथील चांदसूर्या वळणावरुन पुढे जात होती. त्याचवेळी बिबट्याने उडी मारली. बेंद्रे यांच्या गाडीपाठोपाठ चारचाकी गाडी येत होती. अचानक बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे सर्वांची गाळण उडाली. लोकांचा राबता दिसल्यामुळे बिबट्या तेथून पळून गेला. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. या परिसरामध्ये आठ दिवसांपूर्वी स्थानिक लोकांना बिबट्याचे दर्शन झाले होते. या प्रकाराने परिसरात घबराट उडाली आहे.