गुन्हे आणि शिक्षा यांची माहिती देणारे डोन्ट डू इट’ हे उपयुक्त पुस्तक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
——————————— कळत न कळत घडणाऱ्या विविध प्रकारच्या गुन्ह्यांच्या शिक्षांची माहिती देणाऱ्या ‘डोन्ट डू इट’ या पुस्तकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच विमोचन करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथील युवा वकील अॅड. यश घोसाळकर यांनी ते लिहिले आहे. “किरकोळ वाटणाऱ्या पण प्रत्यक्षात गंभीर असणाऱ्या गुन्ह्यांची सुटसुटीत शब्दांत माहिती देणारे प्रत्येकाच्या उपयोगाचे पुस्तक” असे वर्णन करत मुख्यमंत्र्यांनी लेखकाचे कौतुक केले. इंग्रजीत लिहिलेले हे पुस्तक मराठी भाषेतही उपलब्ध व्हावे अशी अपेक्षा त्यांनी प्रकट केली.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, लहान मुलांना दमदाटी करणे, एखाद्याला दुखापत करणे, हेल्मेट न घालता दुचाकी चालविणे यापासून व्यभिचार, अश्लील व्हिडिओग्राफी यासारख्या गंभीर गुन्ह्यांपर्यंत निरनिराळ्या पन्नास गैरकृत्यांची या पुस्तकात माहिती दिली आहे. ही कृत्ये करणाऱ्यास दंड अथवा तुरुंगवास या स्वरूपात होणारी शिक्षा, कारवाईचे अधिकार असणाऱ्या कर्मचाऱ्याचा हुद्दा, कायदा आणि त्याचे कलम तसेच स्पष्टीकरण देणारी उदाहरणे अशी सविस्तर माहिती दिल्याने किरकोळ वाटणाऱ्या आणि दैनंदिन जीवनात अनेकांकडून केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांचे गांभीर्य वाचकांच्या लक्षात येईल.
या पुस्तकाला परिशिष्टे जोडून विविध प्रकारची न्यायालये, त्यांच्या अधिकार कक्षा, गुन्ह्यांची व्याप्ती याची स्वतंत्रपणे माहिती दिली आहे. सोप्या इंग्रजी भाषेत लिहिलेले या एकाहत्तर पानांच्या पुस्तकाच्या मनोगतात लेखक अॅड. घोसाळकर यांनी सामान्य माणसाचे वर्तन गुन्हेविरहित होण्यास तसेच देशात सार्वजनिक स्वच्छता आणि पर्यावरण स्नेही वातावरण निर्माण होण्यास या पुस्तकाची मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
राष्ट्रीय पातळीवरील सामाजिक कार्यकर्ते दादा इदाते, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, मुंबई बार कौन्सिलचे सदस्य संग्राम देसाई, प्रथितयश वकील जी. एन. गवाणकर, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी पुस्तकाला दिलेल्या शुभेच्छा संदेश आणि प्रस्तावना यांतून पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित होते.
रत्नागिरी येथील ‘अवेश्री प्रकाशना’ने या पुस्तकाची निर्मिती केली आहे, कायदा या विषयाचे विद्यार्थी, पत्रकार तसेच जिज्ञासू व्यक्तींनी विकत घेऊन संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे. (किंमत १८०/-₹, चौकशी – ७०६६२६९६८९)
www.konkantoday.com