मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात माशांचा कंटेनर उलटला

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात ब्रेक निकामी झाल्याने ताजी मासळी वाहून नेणारा कंटेनर रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन शेतात उलटला. कंटेनरच्या केबिनमध्ये पाय अडकून फसलेल्या चालकाला पोलीस आणि नागरिकांनी बाहेर काढले. हा अपघात रविवारी दि.23 रात्री 8.40 वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातानंतर मासळीचे क्रेट शेतात अस्ताव्यस्त पडल्याने अपघातस्थळी माशांचा खच पडला होता.
गुजरात राज्यातील वेरावळ ट्रान्सपोर्ट कंपनीचा कंटेनर क्रेटमध्ये ताजे बांगडे घेऊन गोव्याकडून मुंबईला निघाला होता. महामार्गावरील भोस्ते घाट उतरत असताना कंटेनरचे ब्रेक अचानक निकामी झाले आणि चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले. चालकाने कंटेनर नियंत्रित करण्याच्या प्रयत्न केला, मात्र तो कंटेनर भोस्ते घाटातील स्वरूप ढाब्याजवळ रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन शेतात उलटला. या अपघाताचा मोठा आवाज ऐकून आजूबाजूच्या रहिवाशांनी अपघातस्थळी धाव घेतली.
कंटेनरच्या केबिनमध्ये चालकाचा पाय अडकल्यामुळे मदतीसाठी याचना करत होता. घटनास्थळी पोहोचलेल्या युवकांनी कंटेनरची केबिन उचलण्याचा प्रयत्न केला मात्र तो असफल ठरला. खेड पोलिसांना अपघाताची खबर मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातात केबिनमध्ये अडकून पडलेल्या चालकाची स्थिती गंभीर असल्याने पोलिसांनी तत्काळ क्रेनला पाचारण केले आणि कंटेनरची केबिन वर उचलून चालकाला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.
मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाट हा दिवसेंदिवस धोकादायक होत चालला आहे. दोन दिवसांपूर्वीच एका भरधाव वेगातील कंटेनरने महामंडळाची एसटी बस, दुचाकी आणि युटिलिटी जीपला धडक देऊन अवघड वळणावरील संरक्षक भिंतीवर आदळला होता. ही घटना ताजी असतानाच रविवारी रात्री पुन्हा कंटेनरचा भीषण अपघात झाल्याने भोस्ते घाटातून प्रवास करताना चालक आणि प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button