
गौराईच्या पूजनानंतर रंगला ओवसा; गोडा-तिखटा सण उत्साहात
रत्नागिरी : विघ्नहर्ता गणरायाचे धूमधडाक्यात आगमन झाल्यानंतर सर्वत्र आनंदोत्सवास प्रारंभ झाला आहे. याच आनंदोत्सवात आणखीन भर पडली असून ज्येष्ठा गौरींचे (लक्ष्मी) देखील मोठ्या थाटात, उत्साहात आणि सोन पावलानं शनिवारी घरोघरी आगमन झालं. गौरी आणतेवेळी ‘गौरी कशाच्या पाऊली आली, सोन्या-मोत्याच्या पाऊली आली’, असे म्हणत गौरी घरी आणण्यात आली. रविवारी गोडा व तिखटा जेवणाचा सण करण्यात आला.
श्री गणरायाचे बुधवारी सर्वत्र जल्लोषात स्वागत झाले. गणरायाच्या आगमनानंतर सर्वत्र गौरींच्या आगमनाची चाहूल लागली होती. यासाठी महिला देखील गेल्या काही दिवसांपासून विविध कामात मग्न होत्या. शनिवारी या महिला सकाळपासूनच गौरींच्या स्वागतासाठी आतूर झाल्या होत्या. या गौरींचे पारंपरिक पद्धतीने आणि सोन पावलाने आगमन झाल्यानंतर महिलांच्या उत्साहाला उधाण आले होते. तसेच गौरीला सजवण्यासाठी या महिला परिश्रम घेत होत्या.
गौरींचे आगमन हा महिलांमध्ये उत्साह व चैतन्य निर्माण करणारा दिवस ठरला. गेल्या चार-पाच दिवसांपासून घराघरांमध्ये मिष्टान्न तयार करण्याची लगबगही सुरू होती. घराघरांत गौरींचे उत्साहात पूजा करण्यात येत आहे. या गौरींना बाजूबंद, लक्ष्मीहार, सुवर्णजडीत कंबरपट्टे, बोरमाळ तसेच सोन्याचे विविध प्रकारचे हार घालून सजवण्यात
आले. असा हा गौरी आगमनाचा सण शनिवारी उत्साहात पार पडला. दुसर्या दिवशी म्हणजेच रविवारी गौरींचे पूजन करण्यात येणार आहे. यावेळी काही घरात पुरणाच्या पोळीचा नैवेद्य तर काही घरात मांसाहारी जेवणाचा बेत आखण्यात आला.
गौरीच्या आगमनाबरोबरच घरात झिम्मा फुगडी, बस फुगडी आदी महिलांचे खेळ रात्रभर सुरू असतात. घरी आलेल्या माहेरवाशिणीसोबत रात्र जागवली जाते. कोकणात सर्वत्र खड्याच्या गौरी आणतात. एखादी सवाष्ण किंवा मुलगी नदीकाठी, तळ्याकाठी अथवा विहिरीपाशी जाते. चार खडे ताम्हणात घेते. तेथून खडे वाजत गाजत घरी आणतात. गौरी आणताना ज्या सवाष्णीने ताम्हणात खडे घेतले असतील तिने मुक्याने चालावे, असा रिवाज आहे. खडे घरात आणण्यापूर्वी ज्या सवाष्णीच्या किंवा मुलीच्या हातात ताम्हण असेल तिच्या पायावर गरम पाणी घालून, हळद कुंकू लावून मग तिला घरात घेण्यात येते. पाटावर रांगोळी काढून त्यावर तांदूळ पसरून खडे ठेवतात. गौरी घरात आणताना पुढील दारापासून ज्या ठिकाणी गौरी बसवायच्या तिथपर्यंत गौरीची पावले रांगोळीने काढतात. असा हा सण उत्साहात सुरू आहे.
