करबुडे येथे टँकरमधून चोरला गॅस
रत्नागिरी: तालुक्यातील करबुडे येथील न्यू शांती हॉटेलच्या मागे असलेल्या शेडमधील टँकरमधून 1 हजार 902 किलो वजनाचा गॅस चोरण्यात आला. ही घटना सोमवार 17 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 1.30 वा. घडली. याबाबत शुभांग बिजेंद्रपाल सिंग (38, रा. पिर्यामिड सिटी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी चारजणांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभांग सिंग हे कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर या पदावर काम करतात. या कंपनीतील गॅस जहाजाव्दारे जयगड पोर्ट जेटीवर येऊन तिथून पाईपव्दारे तो गॅस टँकरमध्ये लोड केला जातो. त्यानंतर जयगड पोर्ट जेटी ते कर्नाटक बेळगाव असा पाठवला जातो. अशाच प्रकारे टँकर (एमएच-17-टी-6881) मधून गॅस बेळगावला पाठवला जात होता. हा टँकर न्यू शांती हॉटेलच्या मागे उभा असताना चार संशयितांनी टँकरमध्ये मशिन फिट करून त्याला असलेल्या 7 नोजलला बीपीसीएल व एचपीसीएल कंपनीचे कमर्शियल गॅस सिलेंडर जोडून एकूण 1 हजार 902 किलो वजनाचा गॅस चोरला. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.