
शिर्के प्रशालेत विविध कार्यक्रम
रत्नागिरी : र. ए. सोसायटीच्या रा.भा.शिर्के प्रशालेमध्ये लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध उपक्रम व स्पर्धा पार पडल्या. प्रभारी मुख्याध्यापक रमेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली प्रशालेच्या रंजन मंदिर सभागृहात हा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमाला व्याख्यात्या प्राजक्ता कदम उपस्थित होत्या. प्रशालेचे उपमुख्याध्यापक कुमारमंगल कांबळे, वरिष्ठ शिक्षिका स्नेहा साखळकर, बी.एड्.च्या प्राध्यापिका डोणे मॅडम व सर्व शिक्षक होते. संपत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता सातवी क च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे उद्घाटन प्राजक्ता कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक समीर पडवेकर यांनी केले. पुष्पहार बनवणे स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी बनवलेले पुष्पहार लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला अर्पण करण्यात आले. या स्पर्धेत विजयी स्पर्धकांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी इयत्ता सहावी अ मधील विद्यार्थी अर्णव भिसे याने केलेली लो. टिळकांची वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. व्याख्यात्या प्राजक्ता कदम यांनी लोकमान्य टिळक यांचे बालपण व सामाजिक कार्य याविषयी मार्गदर्शन केले. रमेश चव्हाण यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन तेजस्विनी यादव तर ऋणनिर्देश अभिजित चव्हाण यांनी केले.