भोस्ते घाटात ट्रकची चार वाहनांना धडक

खेड : मुंबई- गोवा महामार्गावर भोस्ते घाटात मंगळवार दि.18 रोजी अवजड माल वाहतूक करणार्‍या ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटून ट्रकची चार वाहनांसोबत धडक झाली. घाट उतरत असताना मोठ्या वळणावर हा अपघात झाला. यामध्ये ट्रकने एसटी बस, दोन दुचाकी आणि महिंद्रा पिकअप अशा चार वाहनांना एकापाठोपाठ एक धडक दिली. या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत.
मुंबई- गोवा महामार्गावर अपघात वाढत आहेत. महामार्गावरील खेडमधील भोस्ते घाटातील अवघड वळणावर मंगळवारी दि. 18 रोजी विचित्र अपघात झाला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या ट्रकवरील चालकाचे भोस्ते घाट उतरत असताना ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्याने दोन दुचाकींना धडक दिली. त्यानंतर समोर चाललेल्या एसटी बसला धडकून त्यापुढे चाललेल्या महिंद्रा पिकअप या गाडीला पाठीमागून ठोकर दिली. हा अपघात इतका भीषण होती की महिंद्रा पिकअप गाडी रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला जाऊन उलटली. वाहनांना धडक दिल्यानंतर ट्रक घाटातील वळणावर संरक्षण भिंतीवर आपटून थांबला.
या अपघातामध्ये पाच जण गंभीर जखमी (नावे समजू शकली नाहीत) झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. अपघातानंतर महामार्गावर सगळीकडे ऑईल पसरल्यामुळे वाहने घसरू लागली. त्यामुळे महामार्गावर या भागात महामार्गाच्या एका बाजूने वाहतूक सुरू ठेवण्यात आल्याने अनेकांचा खोळंबा झाला. पोलीस घटनास्थळी वाहतूक नियमन व अन्य उपाययोजना केल्या. जखमींना खेडमधील लवेल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button