
रत्नागिरी तालुक्यातील ग्रा. पं. निवडणुकांत स्थानिक आमदार सामंत यांना धक्का
रत्नागिरी : तालुक्यात झालेल्या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने यश मिळवले आहे. स्थानिक आमदार व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना हा धक्का समजला जात आहे. फणसोप, पोमेंडीसह शिरगावमध्ये भगवा फडकला आहे. शिरगावमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने बहुमत मिळवूनही सरपंचपदी पराभव पत्करावा लागला.
शिरगावमध्ये 17 पैकी 14 जागांवर बाळासाहेबांची शिवसेना व भाजपचे उमेदवार विजयी झाले. तर तीन जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. शिरगावमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून फरिदा रज्जाक काझी व अल्ताफ जाफर संगमेश्वरी हे विजयी झाले. सर्वसाधारण स्त्री गटातून रहिमत अलिमियाँ काझी व सना अजिम चिकटे, सर्वसाधारण गटातून शकिल इस्माईल मोडक, सचिन सुरेश सनगरे, मयुर कृष्णा सांडीम, उझेर महमंदअली काझी, सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून नुरीन मुकादम, कांचन काशिनाथ गोताड, अंकिता अंकुश सनगरे, खुशबू आसिफ काझी, स्नेहा प्रथमेश भरणकर, जान्हवी पंकज कदम, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री गटातून मिथिला ओंकार शिंदे, निरजा निखिल शेट्ये हे उमेदवार विजयी झाले.
सरपंचपदाच्या निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीच्या फरीदा रज्जाक काझी यांनी 2067 मते मिळवून त्या विजयी झाल्या. अपक्ष उमेदवार श्रध्दा दीपक मोरे या 1902 मते घेऊन दुसर्या क्रमांकावर तर बाळासाहेबांची शिवसेनेच्या साक्षी परेश कुमठेकर यांनी 1763 मते घेतली.
पोमेंडी ग्रा.पं.मध्येही उद्धव ठाकरे गटाच्या ममता अंकुश जोशी या विजयी झाल्या. त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या विधी विकास बारगोडे यांच्या पराभव केला. या ठिकाणी भाजप व बाळासाहेबांच्या शिवसेनेची युती झाली नाही. त्याचा फटका बसला. भाजपच्या राजश्री कांबळे यांनी सहाशेहून अधिक मते घेतली. तर सदस्यपदी गाव पॅनलचे दिगंबर मयेकर, सायली सुरेश बाणे, राजेंद्र शंकर कदम, विशाल प्रभाकर भारती, प्रांजल प्रशांत खानविलकर, भाजप विजया विजय कांबळे, महाविकास आघाडी नलिनी विनोद कांबळे, राजेंद्र गोपाळ कळंबटे, रेश्मा रमेश कांबळे, प्राजक्ता प्रकाश जोशी हे उमेदवार विजयी झाले. गावपॅनलला बाळासाहेबांची शिवसेनेने पाठिंबा दिला होता.
फणसोप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राधिका राकेश साळवी आणि अमृता शेलार यांच्यात थेट लढत झाली. दोन्ही शिवसेनेमध्ये झालेल्या या लढतीत राधिका साळवी या पावणे चारशे मतांच्या आघाडीने विजयी झाल्या. फणसोपमध्ये राकेश साळवी, अक्षया पराग साळवी, रितेश रवींद्र साळवी, रेणुका राजेंद्र आगे्र, साक्षी चौगुले हे पाच उमेदवार विजयी झाले. यातील राकेश साळवी हे शिंदे गटाचे असून उर्वरीत चारही विजयी उमेदवार या ठाकरे गटाच्या आहेत.