भरणे येथे भंगार चोरी करणार्या पाचजणांना पोलिस कोठडी
खेड : भरणे येथे 2 लाख 90 हजाराच्या भंगाराच्या चोरी प्रकरणी पोलिसांनी पाचजणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांची रवानगी दोन दिवसांसाठी पोलिस कोठडीत केली आहे. ग्रामपंचायत हद्दीतील आडे गुरूजी मार्गावरील चिले यांच्या घराशेजारी उघड्या जागेवर उभ्या असणार्या बंद डंपरचे गॅस कटरच्या साहाय्याने कटिंग करून ही चोरी करण्यात आली. 3 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसम डंपरचे भंगार चोरत असताना डंपर मालकाने पोलिसांना कळवले होते. पोलिसांनी या प्रकरणी संशयित जनार्दन पांडुरंग पवार (वय 30, रा. भरणे), सचिन परशुराम तटकरे (वय 55, रा. शिवतर, ता. खेड), अनिल तुकाराम महाडिक (वय 55, रा. शिवतर), अनिल अशोक जाधव (वय 31, रा. तिसे), जयेश बाळाराम आंब्रे (रा. जाबरेवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) यांना अटक केली. त्यांना खेड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी दोन दिवसांसाठी पोलिस कोठडीत केली आहे. डंपर मालक राकेश एकनाथ कोळी यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या चोरी प्रकरणी पोलिसांनी टेंम्पो (एमएच08, डब्ल्यू 4378) व दुचाकी (एमएच 07 , एवायई 199) ही दोन वाहन व डंपर कटिंग करण्यासाठी गॅस कटर, एक व्यावसायिक एलपीजी सिलेंडर व 6 गॅस सिलेंडर असा एकूण 2 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.