आता न्यायालयात साक्ष देताना आरोपी समोर दिसणार नाही; रत्नागिरी जिल्हा न्यायालयात अंमलबजावणी
रत्नागिरी : गंभीर किंवा मोठमोठ्या गुन्ह्यातील आरोपींच्या पोटात भीतीचा गोळा उठेल, अशी कार्यवाही जिल्हा मुख्य व सत्र न्यायाधीशांकडून सुरू झाली आहे. गंभीर गुन्ह्यातील साक्षीदारांना न्यायालयात निर्धास्तपणे साक्ष देता यावी यासाठी न्यायदान कक्ष निर्माण करण्यात येणार आहे. या न्यायदान कक्षात आरोपीला साक्षीदार आणि साक्षीदाराला आरोपी समोरासमोर पाहू शकणार नाही, अशी या न्यायदान कक्षाची रचना केली जाणार आहे.
मोठमोठ्या गुन्ह्यातील साक्षीदार भीतीने फुटणे किंवा फितुर होतात. यामुळे त्या गुन्ह्याच्या खटल्यावर परिणाम होऊन याचा फायदा आरोपीला होत असतो. साक्षीदार आरोपींना घाबरून किंवा जबरदस्तीने होणार्या प्रलोभनांना बळी पडल्याने गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे फावते. यातून गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळण्याची भीती असते.
न्यायालयात जेव्हा खटला चालतो आणि साक्ष होते तेव्हा आरोपी आणि साक्षीदार समोरासमोर असतात. अशावेळी साक्षीदारावर मानसिक दबाव येऊन साक्ष बदलली जाण्याचीही शक्यता असते. या पार्श्वभूमीवर जिल्हा मुख्य व सत्र न्यायाधीश एम. क्यू. एस. एम. शेख यांनी अशा असुरक्षित साक्षीदारांच्या जबानीसाठी आवश्यक सुविधांसह नवीन न्यायदान कक्षाचे बांधकाम करण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये आरोपी आणि साक्षीदार एकमेकांसमोर येणार नाहीत. याची काळजी घेतली जाणार आहे.
याबाबतचा 20 लाख रूपये खर्चाचा आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बनवण्यात आला आहे. रत्नागिरीतील न्यायालयाच्या जुन्या इमारतीत तळमाळ्यावर हे नवीन न्यायदान कक्ष आवश्यक सुविधांसह साकारले जाणार आहे. या न्यायदान कक्षामध्ये साक्षीदार कोण आहे, हे आरोपीला दिसणार नाही अशी रचना असणार आहे. येथेच न्यायाधीशांची केबिन, कोर्टरूममध्येच डायस असणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने 20 लाख रूपये खर्चाचे अंदाजपत्रक बनवले असून, यावर गुरूवारी सार्वजनिक बांधकाम अभियंता आणि न्यायाधीशांची बैठक झाली.
सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या या अंदाजपत्रकाला न्यायालयाच्या फंडातून किंवा जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.