
कोकण बोर्डाला लवकरच स्वत:ची हक्काची इमारत : शिक्षणमंत्री दीपक केसरकर
लांजा : रत्नागिरीत असलेल्या कोकण बोर्डाला लवकरच स्वत:ची हक्काची इमारत मिळणार असल्याचे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी लांजा येथे सांगितले. शालेय शिक्षणमंत्री रत्नागिरी दौर्यावर आले असता लांजा शहरातील न्यू इंग्लिश स्कूल व तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय लांजा या प्रशालेला सदिच्छा भेट देत गुणवत्तापूर्ण शिक्षण देणार्या न्यू एज्युकेशन सोसायटी लांजा शिक्षण संस्थेचे कौतुक केले.
यावेळी संस्थाध्यक्ष जयवंत शेट्ये यांनी ना. केसरकर यांचा सत्कार केला. यावेळी मुख्याध्यापक विद्या आठवले, विनय बुटाला, पुरुषोत्तम साळवी यांनी ना. केसरकर यांचा सत्कार केले. संस्थासंचालक महंमद रखांगी यांनी प्रास्ताविकात दीपक केसरकर यांच्या अभ्यासू कार्यपद्धतीचे कौतुक करीत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षणसंस्था व शिक्षकांचे अनेक वर्षाचे प्रलंबिल प्रश्न ना. केसरकर यांनी आपल्या कार्यकाळात मार्गी लावावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी श्रीम. सुवर्णा सावंत, लांजाचे तहसीलदार प्रमोद कदम, संस्थेचे उपाध्यक्ष सुनील कुरूप, कार्यवाह विजय खवळे, सहकार्यवाह संजय तेंडुलकर, संचालक राजेश शेट्ये, पुरुषोत्तम साळवी, माजी विद्यार्थी असोसिएशनचे अभिजित राजेशिर्के, उपमुख्याध्यापक जाधव सर, पर्यवेक्षक भैरू सोनवलकर, गोविळ हायस्कूलचे मनोज लाखण आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने शिक्षकवर्ग उपस्थित होता.