लांजातील अल्पवयीन मुलीला गर्भवती करणार्‍याला 20 वर्ष सक्तमजुरी आणि 24 हजारांचा दंड

0
28

लांजा : परिसरातील अल्पवयीन 14 वर्षीय मुलीशी  शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती करणार्‍या आरोपीला विशेष पोक्सो न्यायालयाने शुक्रवारी 20 वर्ष सक्‍तमजुरी आणि 24 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पीडितेच्या आईने याबाबत आरोपी अक्षय गवड विरोधात कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. परंतु, हा गुन्हा लांजा येथे घडल्याने हा गुन्हा लांजा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.
अक्षय शिवाजी गवड (वय 23, मूळ रा. बादेवाडी पन्हाळा, कोल्हापूर सध्या रा. लांजा, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. मे 2020 ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत त्याने लांजातील अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवले. काही दिवसांनी पीडितेच्या आईने मुलीला त्रास होऊ लागल्याने खासगी डॉक्टरांकडे नेले होते. त्यात ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्याने पुढे कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात तिचा गर्भपात करण्यात आला.
लांजा पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. शुक्रवारी या खटल्याचा निकाल देण्यात आला. पोक्सो विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश वैजयंतीमाला राऊत यांनी सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्‍ता पुष्पराज शेट्ये यांनी 18 साक्षीदार तपासून केलेला युक्‍तिवाद ग्राह्य मानून आरोपीला दोषी ठरवून 20 वर्षे सक्‍तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली. तत्कालीन पोलिस निरीक्षक अनिल गंभीर आणि पोलिस निरीक्षक श्‍वेता पाटील यांंनी या गुन्ह्याचा तपास केला होता. तसेच पैरवी अधिकारी म्हणून कदम यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here