चिपळुणातील शिंदे गटाचे न.प.ला विविध समस्या सोडवण्यासाठी निवेदन
चिपळूण : शिंदे गटात जाण्याचा पक्का निर्धार केलेल्या चिपळुणातील शिवसैनिकांनी शहरातून विकासकामांचा मुद्दा हाती घेतला आहे. प्रलंबित विविध कामांमुळे नागरिकांना होणार्या त्रासाकडे प्रशासनाचे लक्ष वेधत ती कामे तत्काळ मार्गी लावावी, अशी मागणी न.प.चे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्याकडे केली आहे. चिपळूण शहरात गेल्या काही वर्षांपासून विविध कामे रखडली आहेत. याच पार्श्वभूमीवर गुरुवार दि. 15 सप्टेंबर रोजी सचिन शेट्ये, अंकुश आवले, सचिन हातिस्कर, निहार कोवळे, रश्मी गोखले यांनी नगर परिषदेवर धडक दिली. मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्याशी शहरातील विविध विषयांवर चर्चा केली. तसेच मागण्यांचे निवेदनही दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासोबत असलेल्या शहरातील शिवसैनिकांनी जनतेचे प्रश्न, समस्या आणि अडचणी सोडविण्यासाठी निर्धार करीत कामालाही प्रत्यक्षरित्या सुरुवात केली आहे. या अंतर्गत चिपळूण शहरातील वडनाका व दादर मोहल्ला परिसराकडे जाणार्या शिवनदी पुलावर दोन्ही बाजूस विद्युत खांब बसवावेत, शहरातील हॉटेल जिप्सी कॉर्नर ते श्री जुना कालभैरव मंदिर परिसरातील दोन्ही बाजूकडील गटाराचे खोलीकरण व मजबुतीकरण करावे, शहरातील गुहागर-कराड रस्त्यावरील शिवनदी पुलावर विद्युत खांब उभारावेत, मुरादपूर भागातील भोईवाडी रस्त्याला भोईवाडी समाज मंदिर ते रेल्वे स्टेशन चौक भागात संरक्षक भिंतीचे बांधकाम करावे आदी विविध विकास कामे मार्गी लावण्याची मागणीही केली.