विजेचा धक्का बसून मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रूपये
रत्नागिरी: विजेचा धक्का बसून मनुष्यहानी होण्याच्या प्रकारामध्ये वाढ झाली आहे. महावितरणचा झटका बसून जिल्ह्यात दोन वर्षांमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची नोंद महावितरणकडे झाली आहे. खराब झालेल्या वाहिन्या, वीज उपकरणांतील दोष, वीज उपकरणे हाताळताना निष्काळजीपणा, विद्युत साधने हाताळण्याकडे दुर्लक्ष, अशा विविध कारणांचा यामध्ये समावेश आहे. विजेचा धक्का बसून मृत्यू झालेल्यांच्या वारसांना महावितरणकडून प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. विद्युत कर्मचारीही अशा प्रकारच्या अपघातातून सुटलेले नाहीत. महावितरण कंपनी असे अपघात टाळण्यासाठी प्रयत्न करीत असली तरी, काही दोष राहिल्याने या घटना घडत आहेत. 2021 या वर्षभरात मानवी एकूण नऊ अपघात झाले असून, दोन अपघातास महावितरण जबाबदार असल्याने प्रत्येकी चार लाख प्रमाणे एकूण आठ लाखांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तपासामध्ये विद्युत निरीक्षकांचा अहवाल ग्राह्य धरला जात आहे. तर 2022 मध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे. वीज ग्राहक, कर्मचारी यांचा, विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्यास व त्यात महावितरणची चूक असेल तर त्याच्या कुटुंबीयांना 4 लाख मदत दिले जाते. या चौदा अपघातामध्ये पाच प्रकरणी महावितरण जबाबदार आहे. संबंधितांना भरपाई देण्यात आली आहे.