रत्नागिरीतील मांडवी बीच स्वच्छतेसाठी हजारो नागरिक किनार्यावर उतरणार
रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिन 17 सप्टेंबर 2022 रोजी देशभरात साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी पृथी विज्ञान मंत्रालयाने भारतातील 7500 हून अधिक स्वयंसेवकांच्या मदतीने एकूण 7500 अधिक कि. मी. किनारपट्टी स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी देशभरातील स्वयंसेवक, भारतीय तटरक्षक दल, नौदलचे प्रमुख आणि नागरिक या मोहिमेचा भाग असतील. विविध शासकीय कार्यालये, धार्मिक-सामाजीक संस्था, पर्यटन संस्था त्या-त्या स्थानिक ठिकाणी विविध बीचसाठी स्वच्छतेची जनजागृती करत आहेत. याच पार्श्वभूमीवर मांडवी बीचवर 17 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वा. स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाची बैठक मांडवी पर्यटन संस्था व रत्नागिरी पर्यटन संस्था यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मांडवी येथे पार पडली. या बैठकीला मांडवी पर्यटन संस्था, भैरव देवस्थान मांडवी, विठ्ठल मंदिर संस्था, सांब मंदिर ट्रस्ट पेठकिल्ला, भैरव देवस्थान मुरुगवाडा, बंदर रोड मित्रमंडळ, गिरोबाचौक नवरात्र उत्सव मंडळ, मांडवी चौपाटी भेळ व्यावसायिक, रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ, युवा ओबीसी संघर्ष समिती, कित्ते भंडारी ऐक्यवर्धकचे पदाधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर सागरी सीमा मंचाचे कोकण प्रांत संयोजक संतोष पावरी, मांडवी पर्यटनचे अध्यक्ष राजीव कीर, भैरी देवस्थान मांडवीचे अध्यक्ष, विठ्ठल मंदिर ट्रस्टचे राजन फाळके, भैरव मंदिर ट्रस्टचे विकास मयेकर, तनया शिवलकर, विनय दाते, कौस्तुभ सावंत, राजू भाटलेकर, नितीन तळेकर, दयाताई चवंडे , राजन शेट्ये आदी उपस्थित होते.