शास्त्रज्ञासोबतचे मंतरलेले तीन तास
पाण्याचे ‘नोबेल’ पारितोषिक म्हणवल्या जाणाऱ्या’ स्टॉकहोम वॉटर प्राईझ’ (१९९३) ने सन्मानित शास्त्रज्ञ आदरणीय डॉ. माधवराव चितळे सरांची आम्ही नुकतीच इंदोर (मध्यप्रदेश) येथील त्यांच्या निवासस्थानी, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील अलोरे येथील मो. आ. आगवेकर विद्यालय आणि सीए. वसंतराव लाड कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध आणि माजी मुख्याध्यापक व शाळा-संस्था समन्वयक अरुण माने सरांसमवेत भेट घेतली.
११ डिसेंबर १९६७ रोजी पहाटे चार वाजून वीस मिनिटांनी कोयना धरण परिसरात ६.७ रिश्टर क्षमतेचा तीव्र भूकंप झाला होता. भूकंपानंतरची परिस्थिती नियंत्रणात आणून कोयनेच्या अलोरेतील तिसऱ्या टप्प्याचे काम मार्गी लावण्यासाठी कोयना बोगदे मंडळाचे अधीक्षक अभियंता म्हणून १९६८ च्या पावसाळ्याच्या दिवसात डॉ. माधवराव चितळे यांची बदली अलोरे येथे झाली होती. १९७१ पर्यंत ते अलोरेत कार्यरत होते. याच काळात अलोरे प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार चिपळूण शहरातील शाळा अलोरेत यावी म्हणून परशुराम एज्युकेशन सोसायटी या चिपळूणच्या शिक्षण संस्थेची शाळा अलोरेत सुरु करण्याचा निर्णय झाला होता. या निर्णय प्रक्रियेच्या प्राथमिक चर्चांत स्थानिक प्रकल्प अधिकारी म्हणून चितळे यांची भूमिका महत्वाची राहिली होती. अलोरे शाळेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या (१९७२-२०२२) पार्श्वभूमीवर चितळे यांच्याकडील ‘अलोरे’तील आठवणी जाणून घेण्याच्या हेतूने ही संवादभेट होती.
याच भेटीत आदरणीय डॉ. चितळे यांच्याशी ‘जलसंवाद’ साधण्यात आला. ही तीन तासांची प्रदीर्घ संवादभेट आमच्यासाठी खूपच मौलिक ठरली. चितळे सरांनी समजावलेले अनेक मुद्दे जीवनभर उपयोगी पडतील. संवादभेट विषयक लेखन आम्ही यथावकाश प्रसिद्ध करू.
मनःपूर्वक धन्यवाद.
धीरज वाटेकर