युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे जिल्हा दौर्यावर; रत्नागिरी, चिपळूण, दापोलीत शक्तीप्रदर्शनासाठी शिवसैनिकांची तयारी
रत्नागिरी : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे शुक्रवार दि. 16 रोजी जिल्हा दौर्यावर येणार असून रोड शो करणार असून शिवसैनिकांबरोबर संवाद साधणार आहेत. रत्नागिरी व चिपळूणमध्ये नुकतीच शिवसेना पदाधिकार्यांची बैठकही झाली. त्यानुसार जिल्ह्यात जंगी स्वागत करण्याची तयारी शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव व आ. राजन साळवी यांनी केली आहे.
रत्नागिरीतील त्यांचा ‘संवाद निष्ठा’ मेळावा 15 हजार लोकांच्या उपस्थितीत होणार असल्याचे आ. राजन साळवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ही सर्व उपस्थिती रत्नागिरी तालुक्यातीलच असणार आहे, असेही आ. साळवी यांनी यावेळी सांगितले. रत्नागिरीतील मेळावा आटोपून ते चिपळूणला आणि तेथून दापोलीकडे रवाना होणार आहेत. युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या सोबत खा.विनायक राऊत, आ.भास्कर जाधव असणार असून खासदारांच्या नेतृत्वाखाली युवा नेत्याचे स्वागत विमानतळावर केले जाणार आहे. शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता त्यांचे विमानतळावर आगमन होणार असून येथून ते साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाजवळच्या मैदानात येऊन येथेच त्यांचा ‘संवाद निष्ठा’ मेळावा होणार असल्याचे आ. साळवी यांनी सांगितले. ठाकरे यांचे विमानतळावर आगमन झाल्यानंतर कोकणनगर मार्गे साळवी स्टॉप येथे येणार आहेत. जलतरण तलावाजवळ संवाद निष्ठा मेळावा झाल्यानंतर आदित्य ठाकरे चिपळूण आणि तेथून दापोलीकडे रवाना होणार असल्याचे आ. साळवी यांनी सांगितले.
आ. भास्कर जाधव यांनी शनिवारी चिपळुणातील शिवसेना पदाधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीत ठाकरे यांच्या जिल्हा दौर्याचे नियोजन व कार्यक्रम ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार चिपळुणात ठाकरे यांच्या रोड शो सह शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर ठाकरे यांची सभाही आयोजित करण्यात येणार आहे. या दौर्याची तयारी शिवसैनिकांकडून प्रामुख्याने युवा सेनेकडून सुरू झाली आहे.