लांजा तालुक्यातील कुर्णे गावात विहिरीत पडून तरुणीचा मृत्यू
लांजा : विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या तरुणीचा तोल जाऊन विहिरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू होण्याची घटना लांजा तालुक्यातील कुर्णे गुरववाडी येथे शनिवारी १० सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कुर्णे गुरववाडी येथील माधुरी मनोहर गुरव असे या २८ वर्षीय तरुणीचे नाव आहे. माधुरी ही मुंबई येथे कामाला होती. गणेशोत्सवासाठी ती आपल्या गावी आली होती. शनिवारी १० सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ती विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली होती. ही विहीर तिच्या घरापासून काही अंतरावर एका वहाळाजवळ आहे. ती घरी न परतल्याने घरच्यांनी जाऊन पाहिले असता माधुरीचा मृतदेह विहिरीत आढळून आला. यानंतर तिचे शवविच्छेदन करून सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.