पीक विमा उतरवलेल्या क्षेत्रामध्ये गतवर्षीच्या तुलनेत घट
रत्नागिरी : नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतीला संरक्षण मिळावे, शेतकर्याचे नुकसान होऊ नये, म्हणून शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजना सुरू केली आहे. गेल्या काही वर्षामध्ये अवकाळी पाऊस, विविध वादळं आणि लष्करी अळीचा प्रादुर्भाव या नैसर्गिक आपत्तीमध्ये भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना शेतकर्यांकडून यावर्षी पिकविमा उतरवण्याला जास्तीत जास्त शेतकर्यांकडून प्राधान्य दिले जाईल, असा अंदाज होता; मात्र तो फोल ठरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी शेतकर्यांनी पिकविमा उतरवला आहे. तसेच विमा उतरवलेल्या क्षेत्रामध्ये गतवर्षीच्या तुलनेत घट झाली आहे.
गतवर्षी प्रधानमंत्री पिकविमा योजनेला जिल्ह्यातील शेतकर्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. प्रतिकूल परिस्थितीचा भातशेतीला फटका बसून शेतकर्यांचे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते; मात्र आपद्ग्रत शेतकर्यांना पिकविम्याचे साहाय्य मिळाले होते.
गतवर्षीप्रमाणे दरवर्षी प्रतिकूल परिस्थितीमुळे भातशेतीच्या होत असलेल्या नुकसानीमुळे यावर्षी पिकविमा योजनेला शेतकर्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून पिकविमा उतरवणार्या शेतकर्यांच्या संख्येमध्ये वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता; मात्र तो फोल ठरला
आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी पिकविमा उतरवणार्या शेतकर्यांच्या संख्येमध्ये 60 ते 70 टक्के घट झाली आहे. विमा संरक्षित क्षेत्रामध्येही 950 हेक्टरने घट झाली आहे. पिकाला विम्याचे संरक्षण मिळून त्याचा परतावाही मिळत असताना शेतकर्यांनी या योजनकडे पाठ फिरविली आहे.