यावर्षी पावसाचे प्रमाण पाहता पाण्याचे नियोजन आतापासूनच सुरू करावे : जलनायक युयुत्सु आर्ते यांचे आवाहन
देवरूख : यावर्षी जून महिन्यामध्ये पाऊस पडला नाही व त्यानंतर पडलेल्या कमी प्रमाणातील पावसामुळे पाण्याची पातळी घटली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात परतीचा पाऊस असल्याचे वेधशाळेने जाहीर केले आहे. अशावेळी नेहमी दिवाळीनंतर करण्यात येणारे पाण्याचे नियोजन आतापासूनच सुरु करावे, असे आवाहन देवरूखमधील जलनायक व सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, नगरपंचायत व नगरपालिकांनी असलेला पाण्याचा साठा व वाहणारे पाणी आतापासूनच अडवून त्याचे योग्य नियोजन करावे, अन्यथा यावर्षी भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल, अशी भीती आर्ते यांनी व्यक्त केली आहे. कमी पावसामुळे उभी भात पिके धोक्यात आली आहेत. यंदा गणपती विसर्जनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नव्हते अशा तक्रारी सगळीकडूनच ऐकावयास मिळत आहेत.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस संपणार असेल व सध्या ओढे व नदीत पुरेसे पाणी उपलब्ध नसेल तर असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करावेच लागेल. अशा वेळी दिवाळीची वाट न पाहता जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, नगरपंचायत व नगरपालिका यांच्याप्रमाणे युवक मंडळे, क्रीडा मंडळे, गाव विकास मंडळे या सर्वांनी आपापल्या गावातील ओढ्यांवर, नदीवर बंधारे बांधून आजच वाहते पाणी अडवून भविष्यातील पाणी टंचाईची तीव्रता कमी करण्यास अवश्य प्रयत्न करावेत. कितीही पाऊस कमी पडला असला तरी आजही कोकणातील ओढे व नद्या वाहत्या आहेत. त्याचा फायदा करून घ्यावा, असे आवाहन आर्ते यांनी केले आहे.