‘एशियाड’च्या नावाने देवरूख डेपोकडून प्रवाशांना भुर्दंड
एशियाडच्या नावाखाली देवरूख डेपोकडून प्रवाशांची लूट सुरू असल्याचा आरोप प्रवाशांतून होत आहे. देवरूख -रत्नागिरी मार्गावर हिरव्या रंगाची एशियाड बस सोडली जात आहे. मात्र एशियाडच्या नावाखाली 5 ते 25 रूपयांपर्यंत जादा रक्कम आकारून प्रवाशांची ऐन महागाईत लूट सुरू आहे.
सामान्यांची गाडी म्हणून एसटी महामंडळाकडे पाहिले जाते. काळानुसार एसटीही रंग बदलत आहे. लाल, पांढरा, हिरवा अशा रंगांमध्ये बस सोडल्या जात आहेत. मिळेल त्या गाडीने प्रवासी प्रवास करतात. मात्र हिरव्या रंगाच्या गाडीला जादा पैसे आकारावे लागतात, हे अनेक प्रवाशांना माहिती नसते. देवरूख-रत्नागिरी मार्गावर हिरव्या रंगाची एशियाड सोडली जात असून यात अनेकवेळा प्रवाशांची फसवणूक होत आहे.
देवरूख – रत्नागिरी मार्गावर गणेशोत्सवात अनेक दिवस काही फेर्या रद्दही करण्यात आल्या होत्या. या मार्गावर दुपारी गर्दीच्या वेळी एशियाड बस सोडली जाते. प्रवाशांना या गाडीचा तिकीट दर माहीत नसल्याने प्रवासीही गाडीत चढतात. दुसरी बस उपलब्ध नसल्याने नाईलाजाने या बसमध्ये चढण्याची नामुष्की प्रवाशांवर ओढवते. गाडीत चढल्यानंतर 5 रूपयांपासून ते 25 रूपयांपर्यंत जादा पैसे प्रवाशांकडून घेतले जातात. त्यामुळे प्रवासीही वाहकासोबत भांडण करतात. काही वेळा अनेक प्रवाशांकडे जादा पैसेही नसतात. त्यामुळे गाडीतून खाली उतरण्याची वेळ प्रवाशांवर येते. पासधारकांनाही या बसमध्ये जादा पैसे आकारले जातात. अनेकवेळा प्रवासी हुज्जत घालतात.
याबाबत देवरूख येथील वाहतूक नियंत्रकांशी संपर्क साधला असता देवरूख डेपोत गाड्या नसल्याचे सांगितले जाते. गाड्या नसल्याने हिरव्या रंगाची एशियाड सोडून प्रवाशांची लूट कशासाठी करता? असा सवाल प्रवासी करत आहेत. जर हिरव्या रंगाची एशियाड सोडायची असेल तर तिकीट दर साध्या गाडीप्रमाणे लावावा, अन्यथा ही गाडी या मार्गावर सोडू नये, अशी मागणी होऊ लागली आहे. याकडे संबंधित आगार व्यवस्थापक व एसटीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.