पुढच्या वर्षी लवकर या! रत्नागिरी जिल्ह्यात गौरी-गणपतींचे विसर्जन

0
137

रत्नागिरी : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!! च्या गजरात रत्नागिरी जिल्ह्यात गणपती बाप्पांचे सोमवारी विसर्जन करण्यात आले. यावर्षी कोणतेही नैसर्गिक संकट नसल्याने भक्तांनी गणेशोत्सव आनंदाने साजरा केला. गौरी-गणपतीच्या गणरायांना सोमवारी निरोप देण्यात आला. प्रमुख नद्यांमध्ये, गणेश घाटांवर, समुद्राच्या ठिकाणी विसर्जन करण्यात आले.  कोरोनामुळे दोन वर्ष गणेश भक्तांच्या उत्साहावर विरजण पडले होते. लोकांना एकत्रित येण्यास निर्बंध घालण्यात आले होते. यावर्षी कोरोना मुक्तीनंतर गणपती उत्सव मोठ्या उत्साहात  साजरा होत आहे. गौरी गणपतीचे सोमवारी सायंकाळी ठिकठिकाणी विसर्जन करण्यात आले. यावेळी भक्तांच्या आनंदाला पारावर उरला नाही. दुपारी तीन वाजल्यापासूनच ग्रामीण व शहरी भागात बाप्पांच्या विसर्जनाला सुरुवात झाली. यावर्षी पाऊसही कमी असल्याने उत्साहाला उधाण आले. चिपळुणात नगर परिषदेच्यावतीने शहरातील 21 विसर्जन घाटाच्या ठिकाणी साफसफाई करण्यात आली होती. त्या ठिकाणी विद्युत रोषणाई व गणेश भक्तांसाठी आवश्यक त्या सुविधा करण्यात आल्या होत्या. वाशिष्ठी नदीपात्रात होणार्‍या विसर्जनसाठी होड्या, पोहणारे नागरिक, निर्माल्य कुंड तयार करण्यात आले होते. तसेच ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला होता. खेड तालुक्यात दि. 31 ऑगस्ट रोजी  गणेशाची स्थापना केली. त्यासोबतच अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखील गणेशमूर्तीची मनोभावे पूजाअर्चा करून उत्सवाला सुरुवात केली. मंगलमय व उत्साहपूर्ण वातावरणात गणेशाची पाच दिवस सेवा केल्यावर सोमवारी 5 रोजी तालुक्यातील 10 हजार 602 घरगुती व  मुरली मनोहर दशानेमा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नातूवाडी प्रकल्प सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, भरणे आणि अग्निशामक दल लोटे-परशुराम औद्योगिक वसाहत सामाजिक गणेशोत्सव मंडळ या तीन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात
आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here