ढोलताशांच्या गजरात रंगली कर्ला-आंबेशेतची गणपती मिरवणूक
रत्नागिरी : ढोल-ताशांच्या गजरात आंबेशेत-कर्ला येथील गणपती मिरवणूक उत्साहात पार पडली. पाच ते सहा तासाच्या मिरवणुकीने दोन्ही गावातील घराघरामध्ये गणरायांचे आगमन झाले. या मिरवणुकीला 37 वर्षांची परंपरा आहे. शंभरपेक्षा अधिक गणरायांच्या विविध आकारातील मूर्तींचा यात समावेश होता.
कर्ला-आंबेशेत या गावांमध्ये शहरातील झाडगाव नाका, परटवणे येथून गणरायांच्या मूर्ती सावरकर चौकात एकत्र आणल्या गेल्या. मिरवणुकीला वाजत-गाजत सुरुवात झाली. हातगाडी, चारचाकी जीप, रथ सजवून त्यामध्ये गणरायांच्या मूर्ती ठेवल्या. दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी जल्लोषात ही मिरवणूक काढली. मिरवणुकीला सकाळी साडेनऊ वाजता सुरुवात झाली. दुपारी साडेतीन – चार वाजता मिरवणुकीची सांगता झाली. पोलीस कर्मचारी, होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात होते. आ. राजन साळवी यांनीही या मिरवणुकीत सहभागी होत ढोल वादनाचा आनंद लुटला. वाहतूक पोलिस निरीक्षक शिरीष सासने यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.