
गणरायाच्या आगमनाने घरोघरी चैतन्य
रत्नागिरी : उत्सवी वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन बुधवारी मोठ्या उत्साहात झाले.
गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी गणपती मूर्ती आणण्याची लगबग सुरू असताना पावसाने दुपारपर्यंत दिलासा दिला. काही तालुक्यांमध्ये गणेशमूर्तींचे घरोघरी आगमन निर्विघ्न झाले. एकूण 114 सार्वजनिक तर 1 लाख 66 हजार 140 घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली.
बुधवारी सकाळपासूनच ग्रामीण भागामध्ये घरासमोर सडा व रांगोळी काढण्यात आल्यामुळे मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. गणरायाचे आगमन होत असल्यामुळे घराघरांमध्ये बाप्पांच्या स्वागतासाठी सर्वांचाच उत्साह दिसून येत होता. दुपारपर्यंत गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. भाविकांनी गणेशोत्सवासाठी म्हणून खास पारंपरिक पोषाख परिधान केले होते.
ढोल-ताशांच्या गजरात सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशाचे वाजत-गाजत, नाचत स्वागत केले. जिल्ह्यात दीड, पाच, सात, नऊ ते अकरा दिवसापर्यंत गणपतीची पूजा करण्याची परंपरा आहे.