मुंबई-गोवा महामार्गावर पडलेले खड्डे बुजवा; चक्क गणरायाने घातले बांधकाम विभागाला साकडे, आरत्याही केल्या, मनसेचे अनोखे आंदोलन
रत्नागिरी : मुंबई – गोवा महामार्गावरील खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पाली – मठ येथे दक्षिण रत्नागिरी जिल्हाच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनोखे आंदोलन केले. प्रतिकात्मक गणपतीच्या हस्ते या महामार्गाचे काम करणार्या ठेकेदाराच्या कार्यालयात जाऊन तातडीने खड्डे भरण्याचे निवेदन देण्यात आले. महामार्गावर आंदोलन करताना आरत्या म्हणण्यात आल्या.
मुंबई – गोवा महामार्गावरील खड्डे गणेशोत्सव प्रारंभापूर्वी तातडीने भरले जावेत यासाठी जिल्हा संपर्क अध्यक्ष सतीष नारकर, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, रत्नागिरी तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. महामार्गावर घोषणांसह टाळ -मृदुंगाच्या गजरात आरत्या करत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेच्या कामगार सेनेचे सुनील साळवी, लांजा तालुकाध्यक्ष मनोज देवरुखकर, राजापूर तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव, महिला शहर अध्यक्षा स्वरा राजेशिर्के यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
महामार्गावर मठ येथे आंदोलन केल्यानंतर येथेच असलेल्या ठेकेदाराच्या कार्यालयात जाऊन प्रतिकात्मक गणेशाच्या हस्ते निवेदन देण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत तातडीने खड्डे भरून चाकरमान्यांना प्रवासाचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले. तातडीने अंमलबजावणी न झाल्यास या पुढचे आंदोलन मनसे स्टाईल असेल, असा इशारा तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांनी कार्यालयातील अधिकार्यांना दिला आहे.