राजापूर तालुक्यात खड्ड्यात वृक्षारोपण करून मनसेकडून निषेध
राजापूर ः राजापूर तालुक्यातील पांगरीखुर्द येथे ओणी-पाचल-अणुस्कूरा मार्गावर पडलेल्या खड्ड्याच्या निषेर्धाथ मनसेचे शाखा अध्यक्ष यश धावडे यांनी खड्ड्यात वृक्षारोपण करून आपला निषेध व्यक्त केला. या अनोख्या आंदोलनाची पाचल परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. ओणी-अणुस्कूरा मार्गावर जागो-जागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गाची पूर्णतः दुरावस्था झाली आहे. वाहनचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. परिणामी या मार्गावर लहान-मोठ्या अपघातांची मालिका सुरू आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील नागरिकांमधून कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे. याचा निषेध म्हणून पांगरीखुर्द गावचे मनसेचे शाखा अध्यक्ष यश धावडे यांनी पांगरीखुर्द येथे या मार्गावर पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करून बांधकाम विभागाचा निषेध केला आहे. त्यांच्या या अनोख्या आंदोलनाचे सर्वत्र कौतुक होत असून, या अगोदरही मनसेने या मार्गाच्या दुरूस्तीसंदर्भात व दुरावस्थेबद्दल मुंडन आंदोलन तसेच मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध केला होता. गौरी-गणपतीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला असताना देखील या मार्गाच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.