
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचा ना. चव्हाण यांनी घेतला आढावा
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या व निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामाबाबत सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर आढावा बैठक घेतली. रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील खासदार, आमदार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याच्या चालू पावसाळी अधिवेशनामध्ये शिवसेना उपनेते तथा आमदार डॉ. राजन साळवी यांनी मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा उपस्थित केला. त्यानुसार या बैठकीत चर्चा झाली. या महामार्गाचे झालेले काम हे काही ठिकाणी निकृष्ट झालेले असल्याने चालकांना गाडी चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. तसेच ठेकेदार कंपनी निधी नसल्याचे कारण देत काम रखडवत आहे. काम करताना ठेकेदार कंपनी पुरेशी काळजी न घेता काम करत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. या महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्णत्वास जावे. डोंगर खचल्याने अनेक ठिकाणी रस्ता बंद करावा लागत असल्याने त्यावरही त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी आ. साळवी यांनी केली होती. त्यानुसार ना. चव्हाण यांनी आढावा घेत येणार्या गणेशोत्सवापूर्वी रस्त्याची डागडुजी करण्याचे मान्य करून ओणी-अणुस्कुरा रस्त्याच्या डागडुजीसाठीसुद्धा निधी उपलब्ध करून देण्याचे मान्य केले.
या बैठकीला खासदार विनायक राऊत, खासदार सुनील तटकरे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार शेखर निकम, आ. योगेश कदम, आ. वैभव नाईक, आ. रवी पाटील, आ. भरत गोगावले, आ. अदिती तटकरे, आ. अनिल तटकरे, आ. बाळाराम पाटील, राजन तेली, दीपक पटर्वधन आदी उपस्थित होते.