भविष्यातील गंभीर धोके टाळण्यासाठी पालकांनी मुलांशी फिजिकली कनेक्ट व्हावे : धनंजय कुलकर्णी “नवनिर्माण हाय”चा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात

रत्नागिरी : “आजचे जग हे मोबाईलचे, संगणकाचे आहे. दोन्ही पालक व्यस्त असल्यामुळे मुलांना त्यांना वेळ देणे शक्य होत नाही. अशावेळी मुलेही मोबाईलमध्ये रमतात. मात्र त्यामुळे आज गंभीर परिस्थिती उद्भवत आहे. म्हणूनच भविष्यातील गंभीर धोके टाळण्यासाठी पालकांनी आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून मुलांशी फिजिकली कनेक्ट झाले पाहिजे. त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, गप्पा मारल्या पाहिजेत, लहान होऊन त्यांच्याबरोबर खेळले पाहिजे,” असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले. रत्नागिरीतील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित नवनिर्माण हाय इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच शाळेच्या कै. मोहन खातू क्रीडा संकुलात रंगला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपस्थित होते.

यावेळी त्यांनी मुलांची आणि त्यांच्या पालकांची संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, उपाध्यक्ष डॉ. अलीमिया परकार, संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंदार गीते, सदस्य मृत्युंजय खातू, नवनिर्माण हायचे मुख्याध्यापक डॉ. अरविंद पाटील, फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या संचालिका ऋतुजा हेगशेट्ये, एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी वेगवेगळी उदाहरणे देत डिजिटल युगात वावरताना पुढच्या धोक्यांपासून पालकांना जागरूक केले. तसेच जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उच्च दर्जाचे असल्याचे सांगतानाच संपूर्ण आपल्यासारख्या शिक्षण संस्था उच्च दर्जाचे ज्ञानदान करत असल्यामुळे जिल्ह्यात विद्यार्थी कुठेही कॉपी करताना आढळले नसल्याचे आवर्जून नमूद केले.

नवनिर्माण शिक्षण संस्था जिल्ह्यात उत्कृष्ट प्रकारे काम करत असून, ही घोडदौड अशीच यशस्वीपणे सुरू राहावी यासाठी शुभेच्छा दिल्या. नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री. हेगशेट्ये यांनी नवनिर्माण हाय ही रत्नागिरीतील पहिली सीबीएससी बोर्डाची शाळा असल्याचे सांगतानाच ‘नवनिर्माण’ने रत्नागिरीत वेगवेगळ्या शिक्षणाचा प्रवाह आणला. तसेच अभ्यासाबरोबरच कलांनाही संधी देण्याचे कामही नेहमीच करत असल्याचे नमूद केले. ‘नवनिर्माण’ने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले इंडोर बास्केटबॉल कोर्ट उभारले असून, लवकरच अद्यावत स्विमिंग पूलही येत्या वर्षभरात येथे तयार होणार असल्याचे श्री. हेगशेट्ये यांनी सांगितले. उपाध्यक्ष डॉ. परकार यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून विविध क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम कला प्रदर्शन आदींचा बक्षीस वितरण सोहळा यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुखसार माद्रे, शितल कांबळे, लुबना दवे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button