जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात फुटल्या दहीहंड्या
रत्नागिरी : जिल्ह्यात मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. गोविंदांचा उत्साह ओसंडून वाहत असताना, तो पाहण्यासाठीही मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. रत्नागिरीसह चिपळूण, खेड, राजापूर, लांजा, संगमेश्वर, देवरुख, गुहागर, दापोली व मंडणगडमध्येही उत्साहाला उधाण आले होते.
कोरोनामुळे गेली दोन वर्ष उत्सव थांबले होते. मात्र, शिमगोत्सवापासून बंदी उठल्यानंतर पुन्हा एकदा उत्सवांचा ज्वर वाढू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून गोपाळकाळ्यासाठी विविध मंडळे सज्ज झाली होती.
कोरोनानंतर जिल्ह्यात खेड, चिपळूण, राजापूरमध्ये पुराचा तडाखा बसला होता. या ठिकाणीही नागरिक, व्यापारी मित्रांनी या संकटातून सावरत हंडीचे उत्साहात आयोजन केले होते.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गावागावासह विशेषत: पंचक्रोशीच्या ठिकाणीही हंड्यांचे जल्लोषात आयोजन करण्यात आले होते.
रत्नागिरीमध्येही अनेक पाच ते सहा थरांच्या हंड्या उभारण्यात आल्या होत्या.
रत्नागिरीत विठ्ठल मंदिरात दुपारी दहीहंडी फोडल्यानंतर शहरात खर्या अर्थाने उत्सवाला सुरुवात झाली. रामआळी, मारुती आळी, राधाकृष्ण नाका, गोखले नाका परिसरातील दहीहंड्या बालगोपाळांनी फोडून उत्सव जल्लोषात साजरा केला. माजी जि प. अध्यक्ष जयसिंग घोसाळे यांनीही दरवर्षीप्रमाणे मारुती मंदिर येथे दहीहंडीचे आयोजन केले होते. रत्नागिरीत सर्वाधिक उंचीच दहीहंडी उभारण्यास श्री. घोसाळे यांनी सुरुवात केली होती. याठिकाणीही सायंकाळी सात वाजल्यानंतर गोविंदांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली होती. शहरातील एसटी स्टॅण्ड परिसरात फळ व्यावसायिकांची दहीहंडी, त्याचप्रमाणे भाजयुमोचे पदाधिकारी राजेश मयेकर यांनीही हॉटेल मंगला समोर दरवर्षीप्रमाणे दहीहंडीचे आयोजन केले होते. याठिकाणी डिजेवर अनेक गोविंदांनी ताल धरला होता. आठवडा बाजार येथे रत्नागिरीचा राजा गणेशोत्सव मंडळासमोर राष्ट्रवादीतर्फे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. तर महाजन क्रीडा संकुलामध्ये मंत्री उदय सामंत पुरस्कृत श्री प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी उभारण्यात आली होती.