संगमेश्वर स्थानकातील प्रवासी निवारा शेड दुरुस्त ,मात्र रस्त्याची समस्या कायम
संगमेश्वर (प्रतिनिधी)- निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून कोकण रेल्वेकडे संगमेश्वर रेल्वे स्थानकातील सुधारणांच्या संदर्भात दिलेल्या पत्राची दखल रेल्वे प्रशासनाने घेतली असून त्यानुसार, येथील फलाटावर प्रशासनाकडून नवीन निवारा शेड बसविण्यात आली आहे. त्यामुळे प्रवांशांना निवारा मिळाला आहे. या झालेल्या कामाबद्दल संबंधित रेल्वे अधिकार्यांचे तसेच स्थानिक आमदार श्री. शेखर निकम साहेब यांचे आभार मानू तेवढे थोडेच आहेत. परंतु असे असले तरी कोकण रेल्वे प्रशासनाने अद्याप येथील जागोजागी पडलेल्या रस्त्यावरील खड्ड्याचे आणि स्थानकातील उखडलेला पेव्हर ब्लॉक दुरूस्तीचे काम झालेले नाहीं. त्यामुळे ते केव्हा दुरूस्त करणार, असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांकडून विचारला जात आहे.
सदर ग्रुपतर्फे काही महिन्यांपूर्वी कोकण रेल्वेशी केलेल्या पत्रव्यवहाराची दखल घेऊन जुलै महिन्यात अधिकार्यांनी संगमेश्वर रोड रेल्वेस्थानकातील परिसराची पाहणी करून रेल्वे स्थानकाकडे येणार्या रस्त्याची दुरुस्ती व इतर सोयीसुविधा याबद्दल लवकरात लवकर काम सुरू करू असे आश्वासन दिले होते. फलाट क्रमांक एक आणि दोन वरील मोडकळीस आलेल्या निवारा शेडच्या दुरुस्तीचे काम करून संगमेश्वरवासियांना गणपतीआधी नवीन निवारा शेडची दुरुस्तीचे काम पूर्ण केले आहे. गणपतीत येणार्या चाकरमान्यांचे स्वागत स्थानक परिसराचीही साफसफाई करून स्थानकाचे रूपही पलटू लागले आहे. परंतु स्थानकाबाहेरील मुख्य रस्त्याला जोडणार्या खराब झालेल्या रस्त्याचे काम अद्यापही बाकी असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी प्रवासी तसेच ग्रुपतर्फे करण्यात येत आहे.
रस्त्यातील खड्डे बुजवण्याच्या कामासंदर्भात गेल्या महिन्यापासून रेल्वे अधिकार्यांशी संपर्क साधत असून त्याचे काम लवकरात लवकर करू अशी फक्त आश्वासनच देण्यात येत आहेत,तरी गणपती येण्याअगोदर रस्त्यावरील खड्डे बुजवा असे पत्रकार संदेश जिमन यांनी सांगितले.
www.konkantoday.com